सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना मदतीचा हात देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी दिली.
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा किसनवीर सहकारी साखर कारखान्या सोबत असलेला करार संपुष्टात आणणे तसेच अजिंक्य तारा सहकारी साखर कारखान्या सोबत भागीदारी करार करणे या दोन विषयांसाठी मंजुरी घेण्यासाठी प्रतापगड कारखाना स्थळावर विशेष साधारण सभा बोलावण्यात आली होती. हे दोन्ही ठराव यांसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.सभेला कारखान्याच्या माजी चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे, व्हा. चेअरमन ऍड. शिवाजीराव मर्ढेकर, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
गेले काही वर्षे कारखाना बंद राहिल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासद, व कामगारांना अडचणींचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आ. शिवेंद्रसिह राजे भोसले यांच्या माध्यमातून अजिंक्य तारा कारखान्याने जावली तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस नेऊन सहकार्य केले. आता अजिंक्य तारा कारखाच्या माध्यमातून प्रतापगड कारखाना सुरु होत असल्याने सभासद व कामगारांना योग्य न्याय मिळणार आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने यशस्वी करण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन सौरभ शिंदे यांनी केले.
ऍड . शिवाजीराव मर्ढेकर यांनी आभार मानले.

