सूर्यकांत जोशी कुडाळ – प्रतापगड कारखाना सुरू रहावा यासाठी तो किसनवीर कारखान्याला चालविण्यासाठी दिला आहे.कामगारांच्या कष्टाचे व हक्काचे पैसे त्यांना मिळावेत तसेच शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे वेळेवर द्यावेत या दोन शर्ती आम्ही सांगितल्या याला जर हे आमचा आडमुठे पणा म्हणत असतील तर ते दुर्दैव आहे. प्रतापगड व्यवस्थापना बाबत संबंधितांकडुन संदिग्ध विधाने करून दिशाभूल केली जात आहे. शेतकरी व कामगारांच्या हितासाठी आम्ही यापुढे ही आग्रही राहणारच . किसनवीर कारखाना व्यवस्थापनाने नुकत्याच एका पञकार परिषदेत प्रतापगड सहकारी साखर कारखान्यावर केलेले आरोप धादांत खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत अशी प्रतिक्रिया प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दोन्ही कारखान्याचे करारावेळी जे कामगार यादीत होते.त्यातील चौदा कामगारांना किसनवीर व्यवस्थापनाने सिझनल ठरवले व कामगारांचे नुकसान केले.ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला त्यांना ऐन कोरोना महामारीच्या काळात पैसै दिले नाहीत.किसनवीर कारखान्यावर नटनट्यां आणि सेलिब्रिटींचे सेलिब्रेशन करण्यात जे पैसे घालवले त्या पैशातून शेतकऱ्यांची देणी भागली असती अशी खरमरीत टीका यावेळी सौरभ शिंदे यांनी केली.
किसनवीर कारखान्याच्या ज्या संचालकांनी दोन महिन्यांपूर्वी विद्यमान चेअरमनच्या मनमानी विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती तेच आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत.सत्तेच्या खुर्चीपुढे कोणालाही शेतकरी व कामगाराचा कळवळा नाही.भाजपा नेते किरीट सौमय्यांनी कोल्हापूर आणि जरंडेश्वरला जाताना आवर्जून किसनवीर कारखान्याला ही भेट द्यावी. आपल्यावरील चौकशीचा ससेमिरा टळावा म्हणूनच ते भाजपात गेले आहेत.अशी उपहासात्मक टीका सौरभ शिंदे यांनी केली.
किसनवीर कारखान्याने प्रतापगड कारखान्यात सोळावर्षांसाठी दीर्घ मुदतीची गुंतवणूक केली असल्याचे ते धादांत खोटे बोलत आहेत.त्यांनी समोरासमोर बसून सोळावर्षांचा लेखाजोखा मांडावा.त्यांनी प्रतापगड मध्ये कोणतीही गुंतवणूक केली नाही.प्रतापगड कारखाना चालवायला घेतला ही चूक असेल असे त्यांना वाटते तर तो त्यांनी परत द्यावा.त्यांची अकार्यक्षमता आमच्या माथी मारु नये.आम्ही ञास दिला म्हणून प्रतापगड चालला नाही म्हणता मग खंडाळा कारखान्याचे गाळप कमी का.किसनवीर कारखान्याचे गाळप कमी का.ज्यांनी ऊस दिला त्यांचे बील अजुनही दिले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले.किसनवीरवर बोजा किती यांच्याशी आम्हाला देणे घेणे नाही.कराराचे तुनतुने वाजवता मग त्यातील अटींचे आपण पालन केले का.प्रतापगड कारखान्याची ५१.४० कोटींची जबाबदारी होती .पण ४५ कोटी दिले.आठ वर्षांत उर्वरित रक्कम दिली नाही. या शिवाय प्रतापगड कारखान्यावर ४० कोटींचे कर्ज काढले.आम्ही कोणालाही ब्लॅकमेल करत नाही.आम्ही कोणत्याही विषयावर उघड बोलण्यास तयार.ही किसनवीर कारखाना चेअरमन यांनी ही भोंदूगिरी बंद करावी.ज्यांनी ५२ हजार सभासदांच्या चुली बंद पाडल्या त्यांनी फुकाचा आव आणू नये अशी टीका सौरभ शिंदे यांनी केली.
महाराष्ट्रातील सर्वात कमी कामगार असणारा प्रतापगड सहकारी साखर कारखाना आहे. किसनवीर संचालक मंडळाने प्रतापगड संचालक मंडळांशी योग्य समन्वय ठेवला नसल्यानेच अशी अडचण आल्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र फरांदे यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, प्रदीप तरडे,बाळासाहेब निकम व संचालक,जावली तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन नारायण पाटील ,जेष्ठ सभासद उत्तमराव पवार उपस्थित होते.
.