Monday, August 17, 2026
HomeTop Newsकुडाळच्या रस्ते व गटर कामाला संथगती; ग्रामपंचायतीचा प्रशासनाला इशारा: आंदोलनाला ग्रामपंचायतचा पाठिंबा...

कुडाळच्या रस्ते व गटर कामाला संथगती; ग्रामपंचायतीचा प्रशासनाला इशारा: आंदोलनाला ग्रामपंचायतचा पाठिंबा ; तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी


कुडाळ, ता. जावली : पाचगणी-कुडाळ रस्ता प्रजिमा अंतर्गत कुडाळ येथील इंदिरा नगर चौक ते कुडाळ बाजारपेठ मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकादरम्यान सुरू असलेल्या रस्ते व गटर बांधकामाला संथगती आल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कामाला गती देऊन उर्वरित रस्ता व गटरचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी कुडाळ ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकामविभागाकडे केली आहे.
    याबाबत ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. सदर काम सन २०२४ पासून मंजूर असून, निविदा प्रक्रियेसाठी अनेक महिने वाया गेले. काम सुरू होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला असतानाही अद्याप केवळ सुमारे ८० टक्के गटरचे काम पूर्ण झाले असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कामासाठी ग्रामपंचायतीने वेळोवेळी सहकार्य करून ठेकेदाराला काम करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. मात्र, एवढ्या मोठ्या कामावर केवळ सहा ते सात कामगार काम करत असून कामात मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. या दिरंगाईला प्रशासन व संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
          काम रखडल्यामुळे गेल्या वर्षभरापासून कुडाळ बाजारपेठेसह परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एस.टी. सेवा, शाळकरी विद्यार्थी, प्राथमिक आरोग्य केंद्रात येणारे रुग्ण तसेच ग्रामस्थांना वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या लांबी-रुंदीबाबत तसेच गटर बांधकामाबाबत पेच निर्माण झाला असून, त्यामुळे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुडाळला सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मिळालेल्या निधीतून हे काम सुरू आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन व ठेकेदाराने अडचणी असलेला भाग तातडीने सोडवून उर्वरित रस्ते व गटरचे काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामपंचायतीने केली आहे. यासाठी ग्रामपंचायत व संबंधित बाधित ग्रामस्थांची संयुक्त बैठक लवकरात लवकर घेऊन विषय मार्गी लावावा, अशीही विनंती करण्यात आली आहे.
             कामाला तातडीने गती न दिल्यास नियोजित आंदोलनकर्त्यांच्या पाठीशी ग्रामपंचायत ठामपणे उभी राहील, असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे. त्यामुळे कुडाळच्या रखडलेल्या रस्ते व गटर कामाचा प्रश्न आता प्रशासन कितपत गांभीर्याने घेतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page