
कुडाळ | – सूर्यकांत जोशी
कुडाळ–पाचगणी रोडवरील कुडाळ गावाच्या प्रवेशद्वारापासून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत बाजार पेठेतून सुरू असलेली बंदिस्त गटारांची कामे म्हणजे विकास नव्हे तर थेट भ्रष्टाचारा उघड तमाशा असल्याचा आरोप कुडाळ ग्रामस्थांमधून होत आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार बाबाराजें च्या माध्यमातून जावळी मध्ये रस्त्याकरिता कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद होत आहे. आपले नेतृत्व जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे असे असताना केवळ व्यक्तिगत स्वार्थ ठेवून निर्माण झालेल्या *सर्व रस्ते हे एक वर्ष व्हॅलिडीटी चे किंवा एका मोसमाचे धनी* असल्याचे गावोगावी रस्त्यांच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. बऱ्याचदा सर आली धावून रस्ता गेला वाहून असे घडताना दिसते. विकास कामे ही सर्वसामान्य जनतेच्या हिताची की ठेकेदारांच्या भल्यासाठी असाच प्रश्न पडत असल्याचे वास्तववादी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी व्यक्त केली आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून सुरु असलेले हे काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या काँक्रीटचे दर्जा नियंत्रण विभागाने तपासणी करावी अशी मागणी होत आहे. त्यातच या बांधकामावर पाणी न मारल्याने काँक्रीट उध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचले आहे. नियमाप्रमाणे काँक्रीटला आवश्यक असलेले क्युरिंग (पाणी मारणे) मुद्दाम टाळले जात असल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.
या घटनेबाबत ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे थेट तक्रारी केल्या असता त्यांनी सदर कामावरील सुपरवायझरला दिवसातून किमान दोन वेळा पाणी मारण्याच्या सूचना केल्या तसेच सदर बांधकामावर सुतळी बारदानी टाकण्याची सूचना केली परंतु हा केवळ तक्रारदारांना समाधान वाटावे इथपर्यंतच आदेश टिकला त्यानंतर मात्र आठवड्यातून क्वचित एक दोन वेळाच पाण्याचा टँकर आल्याचे प्रत्यक्षदर्शींचे मत आहे.याबाबत संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी वास्तव तपासण्याऐवजी “कधीतरी पाणी मारले” असे म्हणत जुन्या छायाचित्रांद्वारे तक्रारदारांची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
अधिकारी–ठेकेदार संगनमताचा संशय
कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी असलेले अधिकारी जाणीवपूर्वक गांधारी भूमिका घेत ठेकेदाराला उघडपणे पाठीशी घालत असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. लोकांचे कररुपी पैसे धुळीत मिसळण्याचे षडयंत्र सुरु असल्याची भावना नागरिकांत तीव्र होत आहे.
‘काम बंद पाडू’ – महेश पवार यांचा इशारा
या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की,
“जर तात्काळ कामांची गुणवत्ता सुधारली नाही तर असे निकृष्ट काम कुडाळ ग्रामस्थ एकजुटीने रोखतील असा इशारा महेश पवार यांनी दिला आहे.