
कुडाळ : कुडाळ सखी मंचाच्या वतीने नागपंचमी निमित्त १७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर, कुडाळ, ता. जावली येथे भव्य नागपंचमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रावण महिन्यातील नागपंचमीचा पारंपरिक उत्सव उत्साहात साजरा करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, महिलांसाठी विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गाणी, उखाणे, फेर तसेच झिम्मा-फुगडी आदी पारंपरिक खेळ व मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत.
या उत्सवाच्या माध्यमातून महिलांना पारंपरिक संस्कृती व लोकपरंपरांचा आनंद घेता यावा, तसेच महिला भगिनींमध्ये स्नेहभाव व सामाजिक एकोपा वाढावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
कार्यक्रमासाठी सर्व सखींनी नऊवारी साडी या पारंपरिक पोशाखात सहभागी होऊन नृत्य-थट्टामस्करीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
नागपंचमीच्या निमित्ताने कुडाळ परिसरातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन कुडाळ सखी मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.