कोरोना योद्धा पत्रकार पांडुरंग रायकर यांचा उपचार वेळेत न मिळाल्याने बळी
जीवधोक्यात घालून वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना वाली कोण ?
पगारी काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण ; सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार नेहमी प्रमाणे वंचितच.
सूर्यकांत जोशी कुडाळ – लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडून समाजाला खूप अपेक्षा आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळापासून ते आज तागायत जनतेच्या विविध प्रश्नांना व अपेक्षाना वाचा फोडून शासनाचे व प्रशासशाचे डोके ठिकाणावर आणण्याचे काम हा चौथा स्तंभ निरपेक्षपणे करत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचे अन्य तीन खांब आणि या खांबांचे अनुयायी आर्थिकदृष्ट्या गोल गरगरीत झाले. त्यांना मनसोक्त पगार ,भत्ते, सोयीसुविधा उपलब्ध झाल्या मात्र लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी जीवावर उधार होऊन लढणारा हा चौथा खांब आजही शासकीय सोयी सवलतींपासून वंचितच राहीला आहे. गेले सहा महिने कोरोना बाबत बित्तंबातमी देऊन लोकांत जनजागृती करणारा टीव्ही 9 दूरचित्र वाहिनीचा पत्रकार ‘पांडुरंग रायकर’ यांचा योग्य वेळी उपचार न मिळाल्याने बळी गेला. त्यामुळे जीवावर उदार होऊन वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना वाली कोण हा सवाल आता उपस्थित झाला आहे.
दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर या कोव्हिड योद्धाला जावली पत्रकार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
कोरोनाच्या या नैसर्गिक आपत्तीत काम करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना पन्नास लाखांपर्यंत विमा संरक्षण शासनाने दिले जाते. कोरोना बाधित लोकप्रतिनिधींवर स्थानिक कोव्हिड सेंटरवर उपचार होत नाही।.त्यांना पुण्यामुंबईत हाय प्रोफाइल सुविधा तातडीने मिळते. पण एका पत्रकाराला पुण्यासारख्या मोठ्या शहरात उपचारा अभावी प्राण गमवावे लागतात. हा अन्याय लोकशाहीच्या चौथ्या खांबावरच का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याच बरोबर या आपत्ती मधील प्रत्येक क्षणाची बित्तंबातमी देण्यासाठी जीवाचे रान करणारा पत्रकार यावेळीही शासनाकडून दुर्लक्षित च राहिला आहे.सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून काम करणाऱ्या पत्रकारांची दखल शासनाने घ्यावी अशी मागणी पत्रकारांमधून व्यक्त होत आहे.
पत्रकारांना विविध प्रकारच्या वार्तांकना बरोबरच कोरोनाच्याही वार्तांकनासाठी समाजात यावे लागत असते.भलेही अनेक मोठ्या दैनिकाच्या किंवा टीव्ही चँनलच्या पत्रकारांना मर्यादित मानधन मिळत असेही. परंतू ग्रामीण भागात विविध दैनिकांचे व व्रत्त वाहिन्यांचे अनेक पत्रकार विनामानधन अथवा नाममात्र मानधनावर पत्रकारिता करत आपली सामाजिक बाधिलकी जपत आहेत.
डोंगर दर्यांत अत्यंत दुर्गम भागात जाऊन पत्रकार समाजाच्या प्रश्नांना व अनेक घटनांना वाचा फोडत आहे. विविध घटना आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पत्रकार स्वखर्चाने या घटनांच्या मुळापर्यंत जाऊन वास्तव उजेडात आणण्याचा कसोसीने प्रयत्न करत असतात. बर्याच वेळी पत्रकारांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होत असतो.अनेकदा विविध प्रकारची गुन्हेगारी प्रकरणांचे वार्तांकन करताना जीवावर बेतत असते.आणि हे सर्व काम पत्रकार सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतः चा वेळ व पैसा खर्च करून करत असतो.ही सामाजिक बांधिलकी विनामूल्य जपण्याची जबाबदारी फक्त या चौथ्या खांबाचीच आहे का.
पत्रकारांना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा आहे. सध्याच्या महागाईच्या काळात प्रपंच चालवण्या इतपत तरी मानधन पत्रकारांना मिळण्याची व्यवस्था शासनाने केली पाहिजे. पत्रकारांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे, पत्रकारांना आरोग्य सुविधा व निवृत्तीवेतन मिळाले पाहिजे. किमान या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांची अधिकृत नोंद शासन दरबारी करुन त्यांना पत्रकार म्हणून शासनानचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे.
आम्हाला बंगला, गाडी,जमीन जुमला नको किमान सन्मानाने जगण्या इतपत तरी आम्हाला आमचा हक्काचे असेल तेवढे द्या अशीच मागणी ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाकडून केली जात आहे.