Thursday, February 19, 2026
HomeTop Newsघरच्या घरी अशी करा विधीवत घटस्थापना

घरच्या घरी अशी करा विधीवत घटस्थापना

सूर्यकांत जोशी कुडाळ. 9421214450.

              कोणतीही धार्मिक पूजा म्हटलं की ती विधिवत व्हावी यासाठी आपले परंपरे नुसार उपाध्ये, ब्राम्हण, जंगम, पुरोहितअथवा अशा धार्मिक विधी बाबत ज्ञान असणाऱ्या ज्ञानी अथवा पंडिताना बोलावले जाते.. परंतु प्रत्येक वेळीच हे सर्व उपलब्ध होतीलच असे नाही. अशावेळी आपल्याला घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हे धार्मिक विधी करून आपल्या श्रद्धा व भावना जोपासून हे परंपरागत सण उत्सव साजरे करावे लागतात. हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असणाऱ्या आणि भक्ती भावपूर्ण वातावरणात सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवात सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यासाठी करावी लागणारी घटस्थापना साध्या सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी मार्गदर्शन करत आहे.

???? नवरात्र घटस्थापना विधी माहिती ????

नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेपासून होतो. देवीच्या पूजनाचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. घट म्हणजे कलश, जो शुभतेचे, ऐश्वर्याचे, समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

???? घटस्थापनेची योग्य वेळ

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रथमेला घटस्थापना केली जाते.

सूर्योदयाच्या वेळी किंवा शुभ मुहूर्तात स्थापना करणे उत्तम मानले जाते. यावर्षी सोमवार दि. 22 सप्टेंबर रोजी पहाटे 5 पासून दुपारी 1.45 पर्यंत घटस्थापना मुहूर्त आहे.

अशुभ काळ (राहू काळ, यम घडी) टाळावा.

???? घटस्थापना साहित्य

पितळेचा/तांब्याचा/मातीचा कलश

पाणी

आंब्याची पाने (५)

नारळ (शेंदूर, वस्त्र लावलेला), रूढी परंपरा असेल तर. काही ठिकाणी कलशावर नारळ ठेवण्यासाठी ताम्हणा मध्ये तांदूळ घेऊन त्यात विड्याच्या पानावर आपले कुलदैवतेच्या प्रतिमा अथवा टाक ठेवण्याची प्रथा आहे  अथवा धान्य मिश्रित माती घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावर महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती यांच्या प्रतिमा टाक अथवा सुपारी ठेवून त्यांना प्रतिष्ठापित करण्याची प्रथा आहे. आपल्या घराण्याची ज्याप्रमाणे रूढी परंपरा असेल त्याप्रमाणे करा.

लाल वस्त्र व फूलमाळा

सुपारी, नाणे, तांदूळ, हळद-कुंकू, अक्षता

सप्तधान्य (जव, गहू, मूग इ. अंकुरण्यासाठी)

माती

पूजेसाठी फुले, अगरबत्ती, दिवा

???? घटस्थापना विधी

1. घरातील पूजा जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.सुशोभीत करावी.

2. मातीत सप्तधान्य पेरून त्यावर कलश ठेवावा.याला वेदिका म्हणतात.

3. कलशात पाणी भरावे. त्यात तांदूळ, सुपारी, नाणे ठेवावे.कलशाच्या गळ्या भोवती कापसाचे वस्त्र अथवा नाडापूडी गुंडाळावी. कशावर हळद कुंकू अष्टगंध एकत्रित करून अशा गंधाने स्वस्तिक काढावे किंवा पाच नाम काढावे.

4. कलशाच्या तोंडावर आंब्याची पाने ठेवून त्यावर वस्त्र गुंडाळलेला नारळ ठेवावा.किंवा एका ताम्हणात तांदूळ अथवा बीज युक्त माती घेऊन महाकाली, महालक्ष्मी, महा सरस्वती यांच्या प्रतिमा, टाक, अथवा तीन सुपाऱ्या यांची स्थापना करावी. जशी रूढी असेल त्या प्रमाणे.

5. नारळावर शेंदूर, कुंकू लावून देवीचा मान करून कलशास ‘देवता’ म्हणून मानावे.जर आपली तशी रूढी, प्रथा असेल तर.

6. कलशासमोर दीप प्रज्वलित करावा

7.   प्रथा व परंपरे नुसार आपल्या देवघरातील देव खाऊच्या पानावर स्थापित करावेत. परंतु नवरात्रीत आपल्या कुलदेवता व ग्रामदेवातांचे टाक अथवा प्रतिमा प्रतिस्थापित कराव्या असे शास्त्र आहे. नवरात्रीत देव स्थापनेत पानाचे देठ आपल्या कडे व शेंडे देवाकडे करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे.या स्थापित देवता नवरात्र समाप्ती पर्यंत जागेवरून उचलू नये. दररोज फुलाने पाणी शिंपडून पूजा करावी. गंध अक्षदा फुल व्हावे नैवेद्य दाखवावा.इतर देवांच्या मूर्तीची नेहमी प्रमाणे पूजा केली तरी चालेल.आपण ज्या देवाचे नवरात्र करतो काहीजण कुलदेवतेचे तर कोणी ग्रामदेवतेचे पूजन करतात

8. .  अशाप्रकारे पूजेचे प्रारंभिक तयारी केल्यानंतर घटापुढे दोन पानावर सुट्टे नाणे व सुपारी ठेवावी. तांदुळावर गणपतीची सुपारी स्थापन करावी उपलब्ध असणारे फळे गुळ खोबरे साखर इत्यादी नैवेद्यासाठी घ्यावे. प्रारंभी गणपतीचे पूजन करावे. त्यानंतर घंटा शंख दीप यांची पूजा करावी. त्यानंतर घटस्थापनेसाठी ठेवण्यात आलेल्या घटाची(कलशाची) हळद कुंकू अक्षदा फुले वाहून पूजा करावी त्यानंतर स्थापित देवतांचे सुद्धा विधिवत पूजा करावी. घटाला माळ चढवावी. या सर्व पूजा आपल्या प्रथेनुसार कराव्यात काही ठिकाणी पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी माळ अडकवली जाते त्या ठिकाणी पानांची माळ लावली जाते खोबऱ्याची वाटी लावली जाते अशा काही विविध प्रकारच्या प्रथा आहेत आपल्या कुलधर्मा कुलाचाराप्रमाणे पूजा करावी.

9. नवरात्रभर सकाळ-संध्याकाळ आरती व पूजन करावे.

10. दररोज सकाळी विधिवत पूजा करताना घटावर फुलमाळ चढवावी.

11. ललिता पंचमी दिवशी घटाला गोड पुरी/ कडाकणी /करंजी असे पदार्थ अर्पण करण्याची/ बांधण्याची ही प्रथा आहे.

12. मंगळवारी दि. 30 रोजी दुर्गा अष्टमीचा उपवास आहे.यावर्षी बुधवारी एक तारखेला नवरात्र समाप्ती (घट उठवणे )आहे. या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करून फुलांची माळ लावावी. नैवेद्य आरती करावी. नऊ दिवसात देवाची सेवा करण्यात आपल्याकडून काही चूक झाली असेल त्यासाठी देवाचे क्षमा याचना करावी तसेच येणारे पुढील काळात देवाची कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहोत. घरामध्ये सुख शांती समृद्धी वंश वृद्धी त्याचबरोबर शुभम मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी. देवापुढे श्रीफळ वाढवावा. ज्या ठिकाणी खंडोबाचे नवरात्र असते त्या ठिकाणी तळी उचलण्याचा कार्यक्रम होतो त्याचबरोबर  गोंधळ व  डवर पूजा केली जाते. व घट उठवले जातात. त्यानंतर देवांची पूजा करून नवरात्र समाप्ती दिवशी ( घट उठवण्याचे दिवशी ) पानाचे देठ देवाकडे करून देव त्यावर बसवले जातात असेही प्रथा आहे.

13. बुधवार दिनांक एक रोजी खंडे नवमी आहे. या दिवशी शस्त्र पूजा केली जाते त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या वाहनांची ही पूजा करतात देवाला गोड नैवेद्य केला जातो.

14.विजया दशमी- दसरा

दहाव्या दिवशी (दसऱ्याला) घट विसर्जन करून पाणी व अंकुर प्रवाहात सोडावेत.आता नदीचे पाणी दूषित होत असल्याचे समोर येत असल्याने हे सर्व निर्माल्य आपल्या घरातील फुलांच्या कुंडीत अथवा शेतात विसर्जित करावे. या दिवशी आपल्या ग्रामदैवतांना सिमोल्लंघन साठी नेण्याचा पालखी सोहळा करण्याची प्रथा आहे. जावली तालुक्यात कुडाळ येथे श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर देवांचा शाही पालखी सोहळा असतो यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित असतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page