
सूर्यकांत जोशी, कुडाळ :
जावली तालुक्यातील विज्ञानप्रेमी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी उत्साहवर्धक ठरणारे ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२५-२६ हे दि. ९ ते ११ डिसेंबरदरम्यान हुमगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. शिक्षण विभाग, पंचायत समिती जावली आणि रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, हुमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हुमगावच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या या विज्ञान महोत्सवात AI मॉडेल्स, रोबोटिक्स, पर्यावरणपूरक उपकरणे, हरित ऊर्जा, जलसंधारण, स्मार्ट शेती आणि नवतंत्रज्ञान अशा विविध विषयांवरील शेकडो प्रकल्पांचे सादरीकरण होणार आहे. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे ‘विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM’ या मुख्य विषयावर आधारित १० AI व रोबोटिक्स प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रे.
प्रदर्शनाचे उद्घाटन ९ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी आणि विधान परिषद सदस्य आ. शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर समारोप ११ डिसेंबर रोजी दुपारी २.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल.
या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांची वैज्ञानिक जिज्ञासा, शोधक वृत्ती आणि नवोपक्रमक्षमतेला चालना मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. तालुक्यातील सर्व शाळांचे प्रकल्प एका ठिकाणी पाहण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
जावलीचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
स्थळ : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, हुमगाव, ता. जावली, जि. सातारा
दिनांक : ९, १० व ११ डिसेंबर २०२५
