Thursday, February 19, 2026
HomeTop News“दसरा मेळावा : विचारांचा मेळावा की बोरीचा बार?”    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे...

“दसरा मेळावा : विचारांचा मेळावा की बोरीचा बार?”    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर होणाऱ्या जनतेवर आज कानात बोटे घालण्याची वेळ.

सूर्यकांत जोशी कुडाळ -9421214450

महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेत दसरा मेळाव्याला ऐतिहासिक स्थान आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून हा मेळावा ठराविक ओळख निर्माण करणारा आणि जनतेला दिशा देणारा मंच राहिला आहे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. शिवसेना फुटली, दोन गट पडले आणि दोन्ही गटांनी आपल्या अस्तित्वाची ताकद दाखवण्यासाठी हा मेळावा आपापल्या पद्धतीने रंगवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण दुर्दैव असं की, या मेळाव्याला आता विचारांचा मेळावा न म्हणता “बोरीचा बार” म्हणावं अशी स्थिती निर्माण झाली आहे.

१. दिशाहीन टीकाटिप्पणी

या सभांमध्ये सर्वसामान्यांना ठोस कार्यक्रम, लोककल्याणकारी योजना, सामाजिक बांधिलकी वा विकासाचा मार्गदर्शन अपेक्षित असतो. पण त्याऐवजी सभेचं स्वरूप केवळ एकमेकांवर टीका, शिव्यांची लाखोळी, वैयक्तिक टिका-टिप्पणी यापुरतं मर्यादित झालं आहे. विरोधकांवर टीका करणे ही लोकशाहीत मान्य बाब आहे, पण त्यात शब्दांचं भान आणि सार्वजनिक शिस्त हे आवश्यकच. आज मात्र भाषणांमध्ये ते पूर्णपणे हरवलेलं दिसतं.

२. सामाजिक बांधिलकीचा अभाव

दोन्ही गटांकडून महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक प्रश्नांवर ठोस व्हिजन दिसत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, शहरी-ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य अशा गंभीर मुद्द्यांना या मेळाव्यात स्थान नाही. जनता प्रश्न विचारते – “आमच्या भवितव्यासाठी काय?” आणि नेते उत्तर देतात – “तो वाईट, आम्ही बरे.” या राजकारणातून केवळ राजकीय पसारा वाढतो, पण जनतेचा विश्वास कमी होतो.

३. सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा प्रयत्न

जेथे मोठ्या प्रमाणावर जनता एकत्र येते, तिथे सामाजिक सलोखा वाढवण्याचं, बंधुभाव जागवण्याचं कार्य होणं अपेक्षित आहे. पण इथे घडतंय उलटं – शब्दांचे बाण, आरोप-प्रत्यारोप, शिव्यांचा पाऊस आणि व्यक्तीपातळीवर केलेले हल्ले. यामुळे समाजात कटुता निर्माण होते. जनतेच्या मनात गोंधळ आणि द्वेषाची बीजं पेरली जातात.

४. भविष्यासाठी धोक्याची घंटा

राजकीय पक्षांनी आपल्या सभांना जर केवळ टोमणेबाजी आणि खालच्या पातळीवरील शब्दयुद्धाचं व्यासपीठ बनवलं, तर समाजातील राजकीय संस्कारच ढासळतील. जनतेचा विश्वास कोसळेल, तरुण पिढीच्या मनात राजकारणाविषयी घृणा निर्माण होईल. लोकशाहीचं आरोग्य टिकवण्यासाठी सार्वजनिक चर्चेचं पातळीवर नेहमी उन्नत असणं गरजेचं आहे.

दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा ठेवा आहे. पण आज त्याचं रूपांतर केवळ बोरीच्या बारासारखं झालंय, हे कटू सत्य नाकारता येत नाही. या मेळाव्यातून समाजाला दिशा देणं, सकारात्मक ऊर्जा देणं आणि महाराष्ट्राच्या भविष्यासाठी ठोस व्हिजन मांडणं ही खरी गरज आहे.
        आज शिवसेनेच्या दोन्ही गटांनी आरशात पाहून स्वतःलाच विचारलं पाहिजे – आम्ही जनतेला काय देतोय? आशा की फक्त आरडाओरडा?

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page