
कुडाळ – जावली तालुका पंचायत समितीच्या होणाऱ्या सभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही भाजपा तीन,शिवसेना दोन, व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक असे पक्षीय बलाबल या सभागृहात आहे.शिवसेना आणि राष्ट्रवादी व मित्र पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक लढवली होती. स्पष्ट बहुमत अभावी जावली पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड अत्यंत रंजक अवस्थेत मध्ये पोहोचली. समान बलाबल असल्यामुळे ईश्वरी चिठ्ठीवर सभापती निवड होईल असे राजकीय वर्तुळात गृहीत धरले जात होते परंतु ऐनवेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा शिंदे यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली व भाजपाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वरिष्ठ पातळीवरून केलेले प्रयत्न आणि जावली तालुक्याच्या राजकारणात माहीर असणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांनी केलेली शिष्टाई यामुळे बहुमत नसताना सुद्धा पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकवण्यात यश आले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र नेहमीप्रमाणेच त्यांना साथ देणाऱ्यांसोबत ऐनवेळी अवसान घातकी राजकीय खेळी केल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.
सभापती, उपसभापती निवडीसाठी आज विशेष सभा सभागृहामध्ये पिठासन अधिकारी राजश्री मोरे, यांचे अध्यक्षतेखाली सभेचे सदस्य व सभागृहाचे सचिव तथा गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तहसिलदार प्रविण मुगदुल, सपोनि सुधीर पाटील यांच्या उपस्थतीतीमध्ये सपन्न झाली.
सकाळी ११ नंतर दोन्ही पदसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली. सभापती पदासाठी भाजपकडून सौरभ शिंदे तर सेना व मित्र पक्षाच्या कडून कुसुंबी गटाच्या पं.स. सदस्या सुनिता दुंदळे यांचा अर्ज दाखल झाला होता. तर उपसभापती पदासाठी भाजपकडून गोरख महाडीक तर सेनेकडून सुनिता दुंदळे असे अर्ज दाखल झाल होते. सुनिता दुंदळे यांनी उपसभापती पदाचा ऊर्ज माघारी घेतल्याने भाजपचे गोरख महाडीक बिनविरोध निवडून आले. सभापती पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सौरभ शिंदे यांना तीन मते मिळाली. तर राष्ट्रवादीचे सदस्या शिल्पा शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सुनिता दुंदळे यांना दोन मते मिळाली. या प्रक्रियेमध्ये भाजपचे सौरभ शिंदे हे बहुमताने विजयी झाले.
यापूर्वी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी ची सत्ता होती त्यावेळी सौरभ शिंदे यांनी उपसभापती पदाची धुरा यशस्वी सांभाळली होती. गोरख महाडीक पहिल्यांदाच निवडून आले आणि उपसभापती झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले सकाळपासूनच पंचायत समिती च्या कार्यालयात बसून होते. तर जावलीचे नेते वसंतराव मानकुमरे नाट्यमय घडामोडी च्या प्रयत्नात होते. भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच सेनेचे व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. काही तडजोडी शेवटपर्यंत चालू होत्या. मात्र काही नेत्यांनी चिठ्ठीवरच सभापतीची निवडणूक झाली पाहीजे अशी भूमिका घेतल्या मुळे अखेर मतदानावर प्रक्रिया पार पडली. आ. शशिकांतजी शिंदे सर्व घडामोडीकडे लक्ष ठेवून होते. तर सेनेचे अंकुश कदम कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सुचना करत होते.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या या निवडणुकीत प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे- कुडाळ गण, सौ. चारुशीला पवार- सायगाव गण, गोरख महाडिक- खर्शी बारामुरे गण हे तीन सदस्य भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडून आले आहेत. म्हसवे गणातून सौ शिल्पा शिंदे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडून आल्या आहेत. कुसुंबी गणातून सौ सुनीता दूंदळे व आंबेघर तर्फ मेढा या गणातून अतीश कदम मुळ राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी असलेतरी वरिष्ठांच्या राजकिय तडजोडी मुळे शिवसेना चिन्हावर लढले. सर्वांनीच ताकद लावल्यामुळे हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत.
जावली पंचायतीच्या स्थापनेपासून काँग्रेस, एसू, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी सत्ता उपभोगली होती. बाबा महाराजांचे मुळे पंचायत समितीवर पहिल्यांदाच भाजपचा झेंडा फडकला आहे. निवनिर्वाचित सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, यांचे ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी जि.प. सदस्य वसंतराव मानकुमरे, जि.प. सदस्या जयश्रीताई गिरी, यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
