Thursday, February 19, 2026
HomeTop Newsना. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाचा ‘परिसस्पर्श’ : समाधान पोफळे यांच्या राजकीय वाटचालीला नवी झळाळी:...

ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाचा ‘परिसस्पर्श’ : समाधान पोफळे यांच्या राजकीय वाटचालीला नवी झळाळी: समाधान पोफळे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


कुडाळ | प्रतिनिधी : सूर्यकांत जोशी
           महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समाजासाठी सातत्याने, निस्वार्थपणे काम करणारे सरपंच परिषदेचे अध्यक्ष समाधान पोफळे यांचे राजकीय कार्य आज लोकांच्या विश्वासाने अधिक उजळून निघाले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी जमलेली अलोट गर्दी ही त्यांच्या कार्याचीच पावती असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी केले.


सोमर्डी (ता. जावली) येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, पंचायत समितीच्या माजी सभापती अरुणा शिर्के, उपसभापती रवींद्र परामणे, मंडलाध्यक्ष संदीप परामणे, मच्छिंद्र मुळीक, अजय शिर्के, रेश्मा पोफळे, समीर आतार, विकास धोंडे, रणजित शिंदे, राजेंद्र महाडिक, किरण भिलारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणुकांची रणनिती स्पष्ट, नेतृत्वावर ठाम विश्वास
मानकुमरे पुढे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तयारी झाली असून जावली तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व सहा पंचायत समित्यांमध्ये भाजपचे उमेदवार बहुमताने निवडून येतील. आपल्या भाषणात त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका टाळत, समन्वय आणि सामंजस्याची भूमिका घेतल्यास गटातील संघर्ष टाळून काही ठिकाणी बिनविरोध मार्ग शक्य असल्याचा सूचक इशाराही दिला.


‘ना. बाबाराजे मुख्यमंत्री होतील’ – समाधान पोफळे
यावेळी समाधान पोफळे यांनी ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची स्वच्छ प्रतिमा, कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्व आणि पक्षीय पातळीवरील विश्वासार्हता पाहता ते भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील.

“माझ्या वाढदिवसाचा गाजावाजा करण्याची हौस नाही; मात्र निवडणूक काळातच वाढदिवस आल्याने कार्यकर्त्यांनी या निमित्ताने मेळाव्याचे स्वरूप दिले,” असे सांगत त्यांनी गेल्या पंधरा वर्षांतील सामाजिक कार्याचा लेखाजोखा मांडला. सरपंच पदाच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास, तालुकास्तरावर सरपंचांचे संघटन, त्यांच्या अडीअडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडून सरपंच परिषदेला राज्यस्तरीय ओळख मिळवून देणे—या कामांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. आगामी काळातही ना. बाबाराजेंच्या नेतृत्वाखाली आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यकर्तृत्वाला मान्यवरांची दाद
प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी पोफळे यांच्या कामकाजाचे कौतुक करत, “सामाजिक बांधिलकीच राजकीय यशाचा पाया ठरते,” असे नमूद केले. यावेळी विविध मान्यवरांनी समाधान पोफळे यांच्या कार्याचा गौरव केला. भाजपचे नवोदित तालुका प्रवक्ते सुरेश गायकवाड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
एकूणच, नेतृत्वाचा विश्वास, कार्यकर्तृत्वाची ताकद आणि जनतेची साथ—या त्रिसूत्रीमुळे समाधान पोफळे यांची राजकीय वाटचाल अधिक धारदार होत असल्याचे चित्र या सोहळ्यातून ठळकपणे समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page