सूर्यकांत जोशी कुडाळ – परीक्षा कालावधीत विद्यार्थीनी साठी कुडाळच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरू केलेली कुडाळ -पाचवड- भुईंज प्रवासाची खाजगी वाहनाने मोफत प्रवास सेवा हा अत्यंत स्तुत्य व आदर्शवत असा उपक्रम आहे. असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शीतल जानवे यांनी केले.
कुडाळ तालुका जावली येथे परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या खाजगी परिवहन सेवेच्या शुभारंभ प्रसंगी डॉ.जानवे बोलत होत्या.
दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत.कुडाळ विभागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना परीक्षेसाठी मोठ्या शहरात जावे लागते.गेले अनेक दिवस एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर वेळेवर व सुरक्षित पोहचता यावे तसेच पुन्हा सुखरूप घरी परत येता यावे यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून परीक्षा कालावधीत मुलींना तसेच मुलांसाठी खाजगी वाहने उपलब्ध करणे बाबत विचार करण्यात आला. त्यानुसार कुडाळ पोलिस दूरक्षेत्रामध्ये हवालदार इम्रान मिटकरी व हवालदार घोरपडे यांच्या सहकार्यातून उपसरपंच सोमनाथ कदम व महेश पवार मित्र परिवार तसेच गजराज मित्र मंडळ , साई चौक मित्र मंडळ व आपलं पिंपळबन यांच्यावतीने परीक्षा कालावधी दरम्यान कुडाळ- पाचवड- भुईंज अशा पद्धतीमध्ये मोफत परिवहन सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे .अशी माहिती यावेळी महेश पवार यांनी दिली.
या उपक्रमाचा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.जानवे -खराडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी सपोनि.अमोल माने व मान्यवर उपस्थित होते.
