सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणूकीत छाननी नंतर ७३ वैध उमेदवारी अर्ज दाखल राहिले आहेत.ही निवडणूक बिनविरोध होऊन कारखाना सुरू होण्यासाठी सामुहिक प्रयत्न व्हावेत अशी सभासदांची इच्छा आहे.परंतु या निवडणुकीत सध्या तीन पॅनल सक्रिय होतील असे चित्र आहे.अर्ज माघार घेण्याच्या मुदती नंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.कोंबडा कुणाचाही आरवुद्या पण दिवस उजाडुन लख्ख प्रकाश पडला पाहिजे अशीच भावना सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.या ७३ मध्ये कारखाना चालविण्याचा तसेच सहकारातील अनुभव असणारे आणि जनहिताची तळमळ असणारे असल्यास २१ संचालक निवडले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केवळ होयबा संचालक कोणत्याही संस्थेसाठी घातकच ठरतात.
गेल्या आठवड्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपण सौरभ शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असे स्पष्ट केले होते.पण आज वेगळी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.कदाचित हा राजकीय गणिमी कावा असूही शकतो. विद्यमान चेअरमन श्रीमती सुनेत्रा शिंदे,सौरभ शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या सोबत जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.दिपक पवार यांनी अगदी सुरुवातीला निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.
जावली तालुक्याच्या दुर्गम व डोंगराळ भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा या भागाचा विकास व्हावा यासाठी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांची असणारी तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा का.शरद पवार यांनी या तालुक्यात साखर कारखाना उभा करावा असा सल्ला दिला.त्याकाळी जावली तालुक्यात साखर कारखाना उभा राहिल याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता.तरीही काकांनी कारखाना उभारणीचे स्वप्न पाहिले.आणि ते पूर्ण करण्यासाठी अगम्य इच्छा शक्तीच्या जोरावर हे अवघड शिवधनुष्य उचलण्याचे धाडस राजेंद्र शिंदे यांनी केले.
राजकारणाच्या दलदलीत राहुन सुद्धा आदरणीय काकांचे व्यक्तीमत्व कमळाच्या फुला प्रमाणे पवित्र होते.आणि हीच विश्वासार्हता कारखाना उभारणीसाठी महत्वाची ठरली.कारखाना उभारणीसाठी आवश्यक भागभांडवल उभे करताना काकांचा शब्द प्रमाण मानला जात होता.कारखान्याचे दिवंगत चेअरमन राजेंद्र शिंदे आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत करून अल्पावधीतच भागभांडवल उभे केले.त्यावेळी राज्यात युती शासन सत्तेवर होते.राज्यस्तरावरील परवानगी मिळवून देण्यासाठी तत्कालीन आमदार सदाशिव सपकाळ यांचीही मदत झाली.तर अन्य अडचणीकडे दस्तूरखुद्द पवार साहेबांचे लक्ष होते.केंद्र व राज्य स्तरावरील परवानगी मिळुन कारखान्याला लायसन्स मिळाल्यानंतर कारखाना उभारणीच्या कामाला वेग आला.
कारखाना उभारणीसाठी आवश्यक जमीन देण्याचा त्याग सोनगाव, करंदोशी व नेवेकरवाडी येथील शेतकऱ्यांनी केला.जसजसे कारखान्याचे काम होत गेले तसतसा कार्यकर्त्यांमधील उत्साह आणि जोश वाढत गेला आणि या उजाड माळरानावर वर्षंभरातच कारखाना उभा राहिला.कारखान्याने चाचणी गळीत हंगामात एक लाख पाच हजार पोती साखरेचे उत्पादन केले.आपले स्वप्न साकार झाल्याचे पाहून काकांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळले.एकीखडे स्वप्न पूर्तीचे समाधान मिळत असतानाच वयोमानानुसार थकलेल्या लालसिंगराव काकांना नियतीने जवळ बोलावून प्रतापगड परीवाराला पहीला धक्का दिला.
एकीकडे प्रतापगड कारखान्याची उभारणी वेगाने सुरू होती तर दुसरीकडे या कारखान्यासाठी ऊसाचे क्षेत्र वाढण्यासाठी होऊ घातलेल्या महू धरणाचे काम ठप्प झाले.या धरणाचे काम सुरू होऊन पंचवीस वर्षे झाली अजुनही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचले नाही .हे अपयश कोणाचे. ही जबाबदारी कोण स्वीकारणार. या धरणाचे भांडवल पंचवीस वर्षे प्रत्येक निवडणुकीत केले जाते.
त्याच दरम्यान कारखान्याचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र शिंदे तथा भैय्या जेसाहेब यांची तब्येत साथ देईना झाली.तशाही परिस्थितीत कारखान्याचा पहिला गळीत हंगाम सुरू करण्यासाठी राजेंद्र शिंदे यांनी प्रयत्न केले.कारखाना चालविण्याचा कोणताही पूर्व अनुभव तत्कालीन संचालक मंडळाकडे नव्हता आणि याचाच फायदा लबाड लांडग्यांनी घेतला.तोडणी वहातुक यंत्रणेने त्यावेळी मोडुन फसवणूक केली.आणि त्याचा आर्थिक फटका कारखान्याला बसला त्याचा परिणाम गळीत हंगामावरही झाला.
आर्थिक अडचणीत रुतलेले कारखान्याचे चाक बाहेर काढण्यासाठी चेअरमन राजेंद्र शिंदे आणि संचालक मंडळ करत असताना त्यावेळी राज्यात अवर्षण आणि ऊसावरील लोकरी माव्याने थैमान घातले.त्यामुळे दुस-या गळीत हंगाम सुरू करण्यासाठी अडचण आली.कारखाना बंद ठेवून बॅंकांची व खाजगी देणी थांबणारी नव्हती.कारखाना चालू ठेवण्यासाठी आर्थिक ताकद कमी पडत होती.त्यामुळे कारखाना पाच वर्षांसाठी सोमय्या ग्रुपच्या गोदावरी शुगर मिल्सला चालवण्यासाठी देण्यात आला.
खरंतर अशा मोठ्या ग्रुप ने कारखाना चालवायला घेणे हे कारखाना, कर्मचारी व जावली तील शेतकर्यांचे मोठे भाग्य होते. परंतू दैवदेते आणि कर्म नेहते अशीच काहीशी स्थिती त्याकाळात दिसून आली.कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न गोदावरी प्रशासन करत होते.दरम्यान घ्या काळात चेअरमन राजेंद्र शिंदे यांची शरीर प्रकृतीने साथ सोडली .हा दुसरा धक्का प्रतापगड परिवारास बसला.
त्यावेळी ऊसाचा तुटवडा असताना जावली तील शेतकऱ्यांनी ऊस देण्यास टाळाटाळ केली.अनेक संचालकांनी सुद्धा ऊस अन्यञ दिल्याचे त्यावेळी समजले.लागणीचा ऊस दुसरीकडे आणि खोडवा निवडा प्रतापगडला अशी स्थिती होती.तरीही या प्रशासनाने मोठ्या प्रमाणात गेटकेन ऊस मिळवून कारखाना चालवला.गोदावरी प्रशासनाने कर्मचारी वर्गाला सन्मान देत असतानाच पगाराची तारीख कधी चुकवली नाही.असे आजही कर्मचारी सांगून त्याबाबत समाधान व्यक्त करतात.
कारखान्याची जबाबदारी विद्यमान चेअरमन व संचालक सौरभ शिंदे यांनी स्विकारली.परंतु आर्थिक गर्तेत अडकलेले कारखान्याचे चाक बाहेर काढणे मुश्किल होते.दरम्यान सोमेश्वर कारखान्याने तीन वर्षे कारखाना सुरळीत चालविला.पण त्यानंतर कारखाना अधिक आर्थिक संकटात सापडला व कारखाना लिलावाच्या उंबरठ्यावर आला.अशा वेळी कारखाना सहकारात रहावा या उद्देशाने किसनवीर सहकारी साखर कारखान्याने सोळा वर्षांचा दीर्घ मुदतीच्या कराराने हा चालविण्यासाठी घेतला.दोन हंगाम व्यवस्थित चालले असताना पुढे किसनवीर सहकारी साखर कारखाना सुद्धा आर्थिक अडचणीत सापडला आणि हे दोन्ही कारखाने गळीत हंगाम घेऊ शकले नाहीत.
वास्तविक कारखाना कार्यक्षेत्रात ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असताना हे कारखाने बंद पडतात हे केवळ संचालक मंडळाचे अपयश म्हणणे योग्य वाटत नाही.त्याला स्थानिक राजकारण ही तितकेच. जबाबदार आहे.राजकीय पोळी भाजण्यासाठी सभासद, कामगार आणि शेतकरी यांचा विचार बाजूला सारला जातो.किसनवीर कारखान्याची आर्थिक कोंडी कोणी जाणीवपूर्वक केली आहे का याबाबतही चर्चा होताना दिसते.खाजगी कारखानदारी चालण्यासाठी जाणीव पूर्वक सहकारी साखर कारखाने अडचणीत आणले जात नाहीत ना अशीही शक्यता समाजातून व्यक्त होत आहे.
प्रतापगड सहकारी साखर कारखाना बंद राहिल्याची सर्वाधिक झळ या कारखान्याच्या कामगारांना बसत आहे.सुरुवातीला कारखान्यात कामाला लागलेले कामगार आता वयाने सेवानिवृत्तीला आले आहेत.पंचवीस वर्षे काम केल्यानंतर या कामगारांचा पगार किती आणि आहे तो वेळेवर मिळतोय का.साठ हजार ते एक लाख रुपयांचे कारखान्याचे शेअर्स घेऊन कारखान्याचे मालक असणारे कारखान्यात नोकरी करत आहेत.आणि आज भिंतीला हातात पगार मिळत नाही.या कामगारांवर असणार्या कौटुंबिक जबाबदारीचे काम होत असेल.
असे अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे पॅनल टाकणारांना द्यावी लागतील.आज जरी निवडणूक अटीतटीची होईल असे चित्र आहे.तरीही अजुनही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली नाही.निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी काही दिवस वाट पहावी लागेल.