प्रतापगड कारखाना निवडणूक विश्लेषण
सूर्यकांत जोशी कुडाळ – प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीची रणधुमाळी नुकतीच संपली.फटाक्यांची आतशबाजी ,गुलालाची उधळण ,आणि विजयी उमेदवारांच्या व नेत्यांचा जयघोष झाला आणि गेले महिनाभर फेब्रुवारी अन् मार्च मधील गुलाबी थंडीत तापलेले जावली तालुक्यातील राजकीय वातावरण तात्पुरते थंड झाले.कारखान्याच्या या निवडणुकीकडे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. या निवडणुकीत मतदार सभासदांनी सत्ताधाऱ्यांना एक सुवर्णसंधी दिली आहे.कारखाना सुरू करण्याचे मोठे आव्हान विद्यमान नवनिर्वाचित संचालकां पुढे असणार आहे.
‘ जो जीता वही सिकंदर ‘या न्यायाने संस्थापक सहकार पॅनलचे नेते सौरभ शिंदे ‘सिकंदर ‘ ठरले.सभासदांनी सत्ताधारी पॅनलवर बहुमताने विश्वास व्यक्त केला.परंतू जो या कारखान्याचा साधा सभासद नाही की ज्याच्या मागे कोणतेही राजकीय पाठबळ नाही अशा परिस्थितीत सुमारे तीस टक्क्यांपर्यंत मतदान मिळवतो ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही.आणि म्हणूनच हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं ! या न्यायाने निवडणुकीत हरुन सुद्धा जवळपास एक हजार सभासदांचा पाठींबा मिळाल्याने एकप्रकारे बाजी जिंकणारे दिपक पवार ‘बाजीगर ‘ ठरल्याची चर्चा जावलीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सौरभ शिंदे च्या राजकीय प्रगल्भतेवर शिक्कामोर्तब
कारखान्याची निवडणूक असली तरीही सौरभ शिंदे यांनी निवडणुक जाहीर झाल्यानंतर आखलेले डावपेच, कार्यकर्त्यांचे केलेले संघटन,नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेले प्रयत्न.वरीष्ठ नेत्यांचे मिळवलेले पाठबळ आणि प्रचाराच्या सांगता सभेत अभ्यास पूर्ण व मुद्देसूद मांडणी करून केलेले प्रभावी भाषण म्हणजे राजकीय परिपक्वता आणि वैचारिक प्रगल्भतेवर शिक्कामोर्तब करणारे ठरले.
ओसाड गावच्या पाटीलकीचा लढा
खरंतर गेले वीस ते पंचवीस वर्षे कारखान्यावर असणारी भाडे वहिवाट आणि गेले चार वर्षं असणारी बंद अवस्था यामुळे या निवडणुकीच्या सुरुवातीलाच ओसाड गावच्या पाटीलकी साठीचा लढा म्हणून हिणवले गेले. होय मुळातच कारखाना ज्या जागेवर उभा आहे ती जागा अक्षरशः ओसाड माळरानच होते.पण या ओसाड माळरानावर नंदनवन फुलवण्याचे स्वप्न माजी आमदार कै .लालसिंगराव शिंदे यांनी पाहिले.आणि ते नंदनवन कारखान्याचे दिवंगत चेअरमन राजेंद्र शिंदे यांनी प्रत्यक्षात फुलवले . दुर्देवाने या पिता पुत्रांना जावली च्या विकासासाठी यापेक्षा अधिक आपले योगदान देण्यासाठी परमेश्वराने संधी दिली नाही.नैसर्गिक , आर्थिक आणि राजकीय अडचणींचा सामना करत हे नंदनवन बहरत होते.असे असतानाच आर्थिक आणि राजकीय कुरघोड्यांत चार वर्षं आर्थिक अवर्षण स्थितीमुळे कारखाना बंद राहिल्याने हे नंदनवन वाळुन सुकुन गेले आणि ओस पडले.या निवडणुकीच्या निमित्ताने हा ओसाड गावच्या पाटीलकीचा लढा सुरू झाला.
….तर ही कारखान्याची अखेरची निवडणूक
ज्या प्रमाणे निसर्ग सृष्टीला संपू देत नाही.तसे या कारखान्यावरचे आर्थिक अवर्षण सुद्धा नक्कीच संपेल. नुकतीच झालेली निवडणूक ही तशी अंतीम इशारा देणारीच ठरली. नैसर्गिक पावसा प्रमाणे नवनिर्वाचित संचालक मंडळाने आवश्यक उपाययोजना करुन कारखाना सुरळीत चालवावा अशी अपेक्षा केवळ सभासद आणि कामगारांचीच नव्हे तर समस्त जावली करांची आहे.विद्यमान संचालक मंडळाने कारखाना सुरळीत चालवला आणि सभासद आणि कामगारांना योग्य सन्मान दिला तर या कारखान्याची पुन्हा निवडणूक लावण्याचे धाडस कोणी करणार नाही.विरोधी पॅनलला झालेले मतदान हे सत्ताधाऱ्यांना इशारा देणारेच असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात होत आहे. दुर्दैवाने जर कारखाना चालू राहिला नाही तर खाजगी करण्याचा कृत्रिम पाऊस होऊन कारखाना सहकारात राहील की नाही हे सांगता येणार नाही.त्यामुळे आता झालेली निवडणूक ही अखेरचीच निवडणूक मानावी लागेल असे मत जाणकार मंडळी व्यक्त करत आहेत.एकीकडे सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणीत सापडतात.तर दुसरीकडे खाजगी कारखाने जोमात चालतात याची कारणमिमांसा पहावी लागेल.
कामगार,ऊस उत्पादक आणि बाजारपेठेचे नुकसान
प्रतापगड सहकारी साखर कारखाना बंद असल्याने कामगार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.त्याबरोबरच त्याचा फटका परिसरातील बाजार पेठेला बसत आहे.कारखाना सुरू असताना बाजारपेठेत सुद्धा ग्राहकांची मोठी वर्दळ असते.कारखान्यात नोकरी मिळावी यासाठी अनेक युवकांनी साठ हजार ते एक लाख रुपयांचे शेअर्स घेतले आहेत.हे बहुतांश सर्वसामान्य कुटुंबातील आहेत.यातील अनेकांचे वय आता सेवावृत्तीचे झाले आहे.एकीकडे कौटुंबिक जबाबदारीचे ओझे वाढत असताना दुसरीकडे कारखान्यांकडे अपेक्षेने हा कामगार वर्ग पहात आहे.
सहकारात निवडणुकीत परिवर्तन घडवणे मोठे अवघड असते.कोणतीही सहकारी संस्था काढताना संस्थेचे सभासद संस्थापकावर विश्वास आणि निष्ठा असणारे होत असतात.किंबहुना आपल्या विचारांशी प्रामाणिक आणि सहमत असणाऱ्याला सभासद केले जाते. परंतू या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलच्या विरोधात झालेले मतदान हे विरोधी नेत्यांवर असलेल्या प्रेमा खातर नव्हे तर कारखाना बंद असल्याने झालेल्या मानसिक उद्विग्नतेतून झाले आहे.असे मानावे लागेल.आणि हा उद्रेक या मध्ये सुधारणा न झाल्यास अधिक तीव्र होऊ शकणारा आहे.या निवडणुकीत बाराशे हुन अधिक मताधिक्याने उमेदवार विजयी झाले आहेत.परंतू निवडणुकीतील जय पराजयातील अंतर जेमतेम सहाशे ते सातशे मतांचे आहे.
दिग्गज नेते असुनही जावलीच्या विकासाची हेळसांड का.
जावली तालुक्याला सध्या दोन आमदार आणि दोन खासदार लाभले आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा बॅंक अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मजबूत व सक्षम नेते लाभले आहेत.एखाद्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बसायला जागा पुरत नाही एवढे मोठ्या संख्येने मातब्बर मान्यवर उपस्थित असतात असे असताना येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आहे हे आश्चर्यकारकच.महु व हातगेघर धरणाचे काम कासवाच्या नव्हे तर मुंगीच्या पावलांनी सुरू आहे.मेढा विभागातील माजी आमदार सदाशिव सपकाळ यांचा गुल्कोज प्रकल्प गुलदस्त्यात आहे.बोंडारवाडी प्रकल्प वीस वर्षे उलटुन गेली तरीही त्याचा अद्याप प्रारुप आराखडा तयार नाही.नैसर्गिक सधनता असुनही पर्यटनाच्या दृष्टीने उपाय योजना नाही.मुख्य रस्त्याच्या साईडपट्या दोन दोन फूट खचल्याने दररोज अनेक जण जायबंदी होत आहेत.अनेकांना प्राणाला मुकावे लागत आहे.धरण उशाला असून पिकांना ,प्यायला पाणी नाही.कारखाना असून ऊस गाळप नाही.अशी येवढी मोठी हेळसांड होत असताना आणि एवढी भयावह परिस्थिती असताना आमचा जावली तालुक्यातील सर्वसामान्य माणूस किती विश्वासाने या नेते मंडळींच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोप घेत आहे असेच म्हणावे लागेल. जावलीतील मतं खूप स्वस्त आहेत.निवडणुकी दरम्यान दारुच्या बाटलीसह जेवणावळी, वातावरण निर्मिती साठी क्रिकेट सामने भरवणे,मंडळांना देणग्या देणे हे ठराविक प्रकार केले की सार्वत्रिक निवडणुकीत मतदान मिळते हे अधोरेखित झाले आहे.त्यामुळे तर विकास कामांचे गांभीर्य रहात नाही ना अशी चर्चा आता होत आहे.
प्रतापगड कारखाना आणि कुडाळी प्रकल्प अनोखं नातं
प्रतापगड सहकारी साखर कारखाना आणि महु हातगेघर धरण यांचे अनोखे नाते आहे.हे दोन्ही विकासाभिमुख प्रकल्प एकाच वेळी प्रस्तावित झाले.प्रतापगड कारखान्याची उभारणी ज्या वेगाने झाली त्याच वेगाने महु हातगेघर धरणाचे काम सुरू होते.परंतु एकीकडे कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला तर तर दुसरीकडे धरण प्रकल्पाचे काम ठप्प झाले.प्रतापगड कारखाना सुरळीत चालण्यासाठी या धरणाचे पाणी शेतात येऊन ऊसाचे क्षेत्र वाढणे आवश्यक आहे.परंतू या धरणासाठी आता पर्यंत एक हजार कोटी खर्च होऊन सुद्धा पाणी शेतात पोहचले नाही.या धरणाच्या पाण्याचा वापर परिसरातील लोकांना वाकळा धुण्यासाठी होत आहे.उन्हाळ्यात या धरणाच्या भिंती रंगबिरंगी वाकळांनी सजलेल्या दिसतात.यावर्षी या धरणाचे पाणी शेतात पोहचणे अपेक्षित होते पण अजुनतरी तशी शक्यता दिसत नाही.
जावली तालुका हा डोंगराळ व दुर्गम आहे.डोंगरकपारीतील माणूस मुंबई सारख्या शहरांवर अवलंबून आहे.अशा परिस्थिती वर काही प्रमाणात मात होण्यासाठी प्रतापगड सहकारी साखर कारखाना तसेच यासम विविध प्रक्रिया उद्योग ,पर्यटन या सारख्या विकासात्मक सुविधा सुरू होणे आवश्यक आहे.