दादागिरी विरोधात संघर्ष करणाऱ्या रांजणेंचा हा सत्कार -चंद्रकांत पाटील.
सूर्यकांत जोशी कुडाळ – दादागिरी विरोधात संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. मग तो कोणत्याही पक्षाचा असो. अगदी कम्युनिस्ट पक्षाचा असला तरीही त्यांचे अभिनंदन करण्यासाठी जाणारच. ज्ञानदेव रांजणे यांनी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आणि विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांच्या दादागिरीला न जुमानता धैर्याने संघर्ष केला म्हणून त्यांचे कौतुक करण्यासाठी आलो आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यापेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी लक्षवेधी होती.
भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या या दौऱ्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.जिल्हा बॅंकेच्या निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.लवकरच जिल्ह्यासह जावलीतील राष्ट्रवादीला मोठें खिंडार पडणार असल्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात आहे.
आंबेघर तर्फे मेढा येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या ज्ञानदेव रांजणे यांच्या घरी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर,जिल्हा परिषद सदस्या सो.आर्चना रांजणे,माजी जिल्हा परिषद सदस्य मच्छिंद्र क्षिरसागर, भाजपाचे माजी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल देशपांडे, नगरसेवक विकास देशपांडे,गिताताई लोखंडे, जयदीप शिंदे ,मोहन कासुर्डे , रामभाऊ शेलार, हरिभाऊ शेलार उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद निवडणुका पक्षाच्या पातळीवर लढवणे अपेक्षित आहे.तसेच अन्य नगरपालिका व छोट्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा राहील असेही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकार पडेल असे विरोधी पक्ष म्हणून आम्ही म्हणत असलो तरीही योग्य वेळी ते आपोआप घडेल असेही पाटील यांनी पञकारांशी बोलताना स्पष्ट केले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे हे गेल्या दोन वर्षांपासून भारतीय जनता पक्षात आहेत.अनेक वेळा ते पक्ष सोडून जातील अशी आवई उठवली तरीही ते पक्षा सोबत ठाम आहेत हे यश आहे.भारतीय जनता पक्षात स्थानिक पातळीवर नेतृत्वाला पूर्ण मुभा असते. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सुद्धा आपल्याशी व पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर चर्चा करुन स्थानिक निर्णय घेत आहेत.कोविड मुळे पक्षीय पातळीवर काम करता आले नाही परंतु आगामी काळात नक्कीच योग्य पद्धतीने काम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करुन आ.भोसले यांच्या बाबत पक्ष समाधानी आहे असे पाटील म्हणाले.