Monday, April 6, 2026
HomeTop Newsराजकीय भेदाला स्वल्पविराम, विश्वास अभेद्य राहणे गरजेचे सुहास गिरी–सौरभ शिंदे यांची अखेर...

राजकीय भेदाला स्वल्पविराम, विश्वास अभेद्य राहणे गरजेचे सुहास गिरी–सौरभ शिंदे यांची अखेर राजकीय दिलजमाई विरोधी उमेदवारांचे चित्र मंगळवारी स्पष्ट होणार : *कुडाळ गटात घडलंय – बिघडलंय*

सूर्यकांत जोशी | कुडाळ
राजकारणात कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात, हेच पुन्हा एकदा कुडाळ जिल्हा परिषद गटातील घडामोडींनी अधोरेखित केले आहे. माजी सभापती सुहास गिरी व जयश्री गिरी आणि प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्यातील दीर्घकाळ चाललेले राजकीय मतभेद अखेर अर्ज दाखल करण्याच्या दिवशी पहाटे मिटले. कुडाळ गट, कुडाळ गण व सायगाव गणातील उमेदवारी निश्चित करण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यश आले.

या दोन नेत्यांतील मतभेदांना सध्या ‘स्वल्पविराम’ मिळाला असला, तरी निवडणूक काळात आणि त्यानंतर विश्वास अभेद्य राखणे तितकेच आवश्यक असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकाच पक्षात राहून चालणारे अंतर्गत मतभेद कार्यकर्त्यांसाठी कायमच डोकेदुखी ठरले आहेत.

जावली तालुक्यातील म्हसवे व कुसुंबी गटांच्या उमेदवारांची नावे लवकर निश्चित झाली आणि प्रत्यक्ष प्रचारालाही सुरुवात झाली. मात्र, कुडाळ गटाची उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी पहाटेपर्यंत प्रलंबित होती. गेली पंधरा वर्षे कुडाळ गटावर दीपक पवार यांचे अधिराज्य असून, सत्ता असूनही हा गट सत्ताधाऱ्यांना कधीच काबीज करता आला नव्हता. ही सल भाजप नेतृत्व व कार्यकर्त्यांच्या मनात होती. त्यामुळे यावेळी कोणत्याही परिस्थितीत कुडाळ गट जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उमेदवारी ठरवताना पक्ष नेतृत्वाला कसोटीला सामोरे जावे लागले.
कुडाळ गटात ओबीसी मतदारांची संख्या लक्षणीय असल्याने ओबीसी उमेदवाराला संधी द्यावी, अशी जोरदार मागणी होती. जिल्हा परिषद अध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने कुडाळला प्रथमच अध्यक्ष पद मिळण्याची आशा कार्यकर्त्यांत पल्लवित झाली होती. अखेरच्या क्षणापर्यंत मोनाली बारटक्के, स्वप्नाली ननावरे, माधुरी गोरे, गीता लोखंडे यांच्या नावांवर चर्चा सुरू होती. मात्र सामाजिक कार्य, जनतेशी असलेला थेट संपर्क आणि राजकीय अनुभव या जोरावर सौ. जयश्री सुहास गिरी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात जयश्री संजय शेवते, स्वप्नाली ननावरे, प्रसन्न रासकर, कल्पना फरांदे, पुनम नायकुडे (राष्ट्रवादी), माधुरी गोरे, गीता लोखंडे, मोनाली बारटक्के यांनी अर्ज दाखल केले आहेत.

कुडाळ गणातून भाजपने प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेंद्र रामचंद्र शिंदे, तर माजी सरपंच वीरेंद्र शिंदे, उपसरपंच सोमनाथ कदम व प्रशांत तरडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र येऊन एकास एक लढत देण्याच्या प्रयत्नात असल्याने प्रत्यक्ष चित्र मंगळवारी अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि दीपक पवार विरोधकांची एकजूट करण्यात यशस्वी ठरतात का, हे तीन तारखेला मंगळवारी कळणार आहे.

दरम्यान, कुडाळ गणातून सौरभ शिंदे यांना उमेदवारी दिल्याने कुडाळला जिल्हा परिषद अध्यक्ष पद मिळण्याचे स्वप्न भंगले, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. राजकीय समीकरणे जुळवताना पक्ष नेतृत्वाला काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात, याचा प्रत्यय या निवडणुकीत उमेदवार निवडताना आला. मात्र भाजपच्याच कार्यकर्त्यांतील नाराजी दूर करणे हे पक्ष नेतृत्वापुढील मोठे आव्हान असणार आहे.
सायगाव गणात सौरभ शिंदे यांच्या विचारांचे तसेच प्रतापगड साखर कारखान्याचे संचालक विवेक पवार यांच्या पत्नी चारुशीला पवार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून साक्षी देशमुख यांचे तगडे आव्हान आहे, तसेच रेश्मा खरात, उज्वला खरात, वैशाली सावंत, वंदना भोसले यांनी अर्ज दाखल केले आहेत.

या संपूर्ण निवडणुक प्रचारासाठी  केवळ सात दिवसांचा अवधी उपलब्ध असून, या अल्प कालावधीत नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढत प्रभावी प्रचार यंत्रणा उभारण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर उभे ठाकले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page