
सूर्यकांत जोशी कुडाळ -9421214450
वादळ अनेक प्रकारचे असते. काही वादळे निसर्गात उठतात, तर काही माणसाच्या मनात. काही समुद्रात जन्म घेतात, तर काही घराघरात, नात्यांत, समाजाच्या मध्यभागी घोंगावू लागतात. वादळ हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर उभा राहतो तो प्रचंड वेगाचा वारा, मुसळधार पाऊस, ढगांची गर्जना आणि क्षणार्धात बदलून जाणारे दृश्य. पण वादळ केवळ हवामानापुरते मर्यादित नसते; ते मानवी जीवनाच्या प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या रूपात अवतरत असते.
समुद्रात उठणाऱ्या वादळांना आपल्या वैज्ञानिकांनी नावे दिली आहेत. तौक्ते, निसर्ग, अम्फान, फानी, गजा, ओखी, बिपरजॉय – ही नावे आपण बहुतेक वेळा बातम्यांतूनच ऐकतो. तोपर्यंत ती केवळ शब्द असतात; पण जेव्हा ती किनाऱ्यावर आदळतात, तेव्हा हजारो कुटुंबांचे संसार उध्वस्त होतात, घरांची छपरे उडतात, शेतजमीन पाण्याखाली जाते आणि आयुष्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. माध्यमांमधून आपण नुकसानाचे आकडे वाचतो, दृश्ये पाहतो, हळहळ व्यक्त करतो आणि पुढच्या बातमीकडे वळतो. परंतु त्या आकड्यांआड माणसांचे आयुष्य असते, स्वप्ने असतात, पुन्हा उभे राहण्याची जिद्द असते.
याच वादळातून पडणारा पाऊस मात्र अनेक ठिकाणी वरदान ठरतो. रखरखत्या जमिनीला ओलावा देतो, शेतकऱ्याच्या डोळ्यांत आशेचे पाणी आणतो, धरणे भरतो, नद्या जिवंत करतो. म्हणजेच एकाच वादळाचे दोन चेहरे असतात – विध्वंसाचा आणि जीवनदायी. प्रश्न वादळाचा नसतो, प्रश्न असतो त्याला सामोरे जाण्याच्या तयारीचा.
पण खरी भीषण वादळे ही नकाशावर दिसत नाहीत. ती माणसाच्या मनात उठतात. अपेक्षांचे वादळ, अपयशाचे वादळ, मत्सराचे वादळ, अहंकाराचे वादळ. या वादळांना कोणतीही अधिकृत नावे नसतात; तरीही त्यांचा वेग प्रचंड असतो. ही वादळे नाती तोडतात, संवाद मोडतात, कुटुंबांची घरे हादरवतात. संसाराच्या दारात उभी राहिलेली ही वादळे कधी घटस्फोटाच्या रूपाने, कधी तुटलेल्या नात्यांच्या शांततेने, तर कधी न संपणाऱ्या संघर्षाने आत शिरतात.
समाजात उठणारी वादळे तर आणखी भयंकर. अफवा, द्वेष, जात-पात, धर्म, राजकारण यांची वादळे समाजाच्या आकाशात घोंगावू लागली की विवेकाची छप्परे उडतात. माणुसकीचे दिवे विझतात. काही क्षणांच्या उन्मादात वर्षानुवर्षांची सलोखा परंपरा उद्ध्वस्त होते. इथेही वादळच असते – पण त्यातून पाऊस नाही, तर राख उरते.
तरीसुद्धा, प्रत्येक वादळानंतर एक शांत पहाट असते. ढग निवळतात, आकाश स्वच्छ होते. प्रश्न असा आहे की आपण त्या वादळातून काय शिकतो? निसर्ग आपल्याला सतत शिकवत असतो – मजबूत पाया असेल तर घर टिकते. मनाचा पाया संयमाचा, समजुतीचा आणि संवादाचा असेल तर कोणतेही वादळ माणसाला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकत नाही.
वादळ टाळता येत नाही, पण त्याला तोंड देण्याची ताकद नक्कीच वाढवता येते. निसर्गाच्या वादळांसाठी भौतिक तयारी आवश्यक आहे; मनाच्या व समाजाच्या वादळांसाठी संवेदनशीलता, जबाबदारी आणि माणुसकीची. कारण शेवटी वादळ कितीही भयंकर असले, तरी ते क्षणिक असते. माणसाची जिद्द मात्र कायमस्वरूपी असते.
आकाशातले वादळ थांबतेच…
प्रश्न एवढाच आहे –
आपल्या मनातले वादळ थांबवण्याची तयारी आपण कधी करणार? जेवढे अपेक्षांचे ओझे तेवढे वादळ तीव्र होते. ज्यावेळी तुम्ही अपेक्षांचे ओझे उतरवाल त्याचवेळी हे मनातील वादळ शमणार एवढे नक्की.