

कुडाळ – जावली तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागातील सर्वसामान्य जनतेला हक्काचा आधार मिळावा यासाठी माजी आमदार कै.लालसिंगराव शिंदे यांनी 38 वर्षांपूर्वी पतसंस्थेची स्थापना केली. दरम्यानच्या काळात जिल्ह्यात अनेक सहकारी संस्थांचे वाताहात झाली परंतु स्वर्गीय काका तसेच स्व.राजेंद्र शिंदे भैय्यासाहेब यांनी निर्माण केलेल्या संस्था सभासदांच्या अतूट विश्वासाने आजही मोठ्या डौलाने चमकत आहेत. गेल्या आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत तब्बल एक कोटींची वाढ झाली असून सभासदांनी दाखवलेल्या या विश्वासाला कदापी तडा जाऊ देणार नाही असे प्रतिपादन जावली पंचायत समितीचे सभापती व काही लालसिंगराव बापूराव शिंदे पतसंस्थेचे मार्गदर्शक सौरभ शिंदे यांनी केले.
कुडाळ तालुका जावली येथील कै.लालसिंगराव बापूसो शिंदे सहकारी पतसंस्थेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेच्या चेअरमन सौ अंकिता सौरभ शिंदे होत्या. प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अंकुशराव शिवनकर,संचालक, बाळासाहेब निकम,प्रदीप शिंदे,जावली तालुका भाजपचे मंडलाध्यक्ष संदीप परामणे,उत्तमराव पवार,धनंजय केंजळे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन रघुनाथ तरडे,संचालक रवींद्र निकम, कांताराम ससाने, श्रीरंग पंडित, नितीन दुदुस्कर,विकास जाधव,लिलावती पवार,जितेंद्र खरात, राहुल बावकर,अशोक रासकर,भानुदास गायकवाड व सभासद उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी पतसंस्थेच्या संस्थापक माजी आमदार कै.लालसिंगराव शिंदे काका व कै.राजेंद्र शिंदे भैय्यासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले याप्रसंगी पतसंस्थेच्या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
पतसंस्थेचे व्यवस्थापक सेवक वर्ग व पिग्मी एजंट यांनी आपापल्या जबाबदाऱ्या कर्तव्यदक्षतेने आणि आत्मीयतेने पार पाडून संस्थेच्या प्रगती मधील सातत्य आणि ठेवेदार व सभासदांचा विश्वास राखला त्याचबरोबर पतसंस्थेच्या चेअरमन पदाची नव्याने जबाबदारी सांभाळत असताना सर्व संचालकांनी तसेच सभासदांनी आपल्यावर पूर्ण विश्वास दाखवला व मोलाची साथ दिली याबाबत पतसंस्थेच्या चेअरमन अंकिता शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच या पुढील काळात पतसंस्थेच्या सर्व सभासदांच्या हितरक्षणासाठी संस्था सदैव सिद्ध राहील तसेच पतसंस्थेचे यशस्वी वाटचालीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि संस्थेची उत्तरोत्तर घोडदौड असे सुरू राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
पतसंस्थेच्या सन 2025 26 या आर्थिक वर्षात संस्थेला पाच लाख 2497 रुपये इतका एकत्रित नफा झालेला आहे. तसेच अहवाल सालात संस्थेच्या ठेवीमध्ये तब्बल एक कोटी रुपयांची वाढ झालेली आहे. संस्थेची सभासद संख्या 3446 असून ठेवी रु.11 कोटी 59 लाख 23 हजार तीनशे दोन आहेत. संस्थेच्या माध्यमातून सभासदांना 8 कोटी 35 लाख 90 हजार 916 रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे तसेच गुंतवणूक दोन कोटी 62 लाख 70 हजार 752 इतकी आहे संस्थेचे खेळते भाग भांडवल 14 कोटी सात लाख 4690 इतके आहे संस्थेला अहवाल सालात ब ऑडिट वर्ग देण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापक प्रकाश शिवणकर यांनी दिली.
दरम्यान पतसंस्थेच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रदीप शिंदे तसेच सभासद धनंजय केंजळे उत्तमराव पवार यांनी काही सूचना मांडल्या त्याला चेअरमन व संचालक मंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिला.
संस्थेचे संचालक जितेंद्र खरात यांनी प्रास्ताविक केले, रवींद्र निकम यांनी उपस्थित त्यांचे स्वागत केले . व्हाईस चेअरमन रघुनाथ तरडे यांनी आभार मानले
