Thursday, February 19, 2026
HomeTop Newsहल्लीचा ‘कांदे पोहे कार्यक्रम’ : परंपरेतून आधुनिकतेकडे एक प्रवास

हल्लीचा ‘कांदे पोहे कार्यक्रम’ : परंपरेतून आधुनिकतेकडे एक प्रवास

सूर्यकांत जोशी कुडाळ.9421214450


                    महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात “कांदे पोहे कार्यक्रम” ही संकल्पना केवळ मुलगा–मुलगी बघण्यापुरती मर्यादित नाही. ती आपल्या संस्कृतीतील साधेपणा, आपुलकी आणि कौटुंबिक मूल्यांचे प्रतीक आहे. घरगुती अंगणात झालेला पाहुणचार, थाळीत मांडलेले पोहे–शिरा, वाफाळता चहा आणि जवळ बसून केलेली ओळख ही नाती जुळविण्याची जुनी पद्धत होती. या साध्या परंपरेतून कित्येक संसार उभे राहिले, कित्येक घराण्यांची गाठ बांधली गेली.

             परंतु आजच्या बदलत्या काळात या परंपरेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. ग्लोबलायझेशन, आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव या साऱ्यांनी “कांदे पोहे कार्यक्रम”ला वेगळाच चेहरा दिला आहे. जसे मुलगा मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमातून कार्यक्रमातून कांदेपोहे दूर जाऊ लागले आहेत तसे उपवर मुलीचे व मुलाचे लाजणे,मुरडणे,चोर नजरेने एकमेकाकडे पाहणे आणि त्याचवेळी मग मित्रपरिवाराने किंवा काही ज्येष्ठ मंडळींनी खोडकरपणे त्यांचे चेष्टा मस्करी  करणे हा आनंदही लुप्त होऊ लागला आहे.

१) साधेपणातून चैनीकडे

पूर्वी पाहुणचारासाठी पोहे, शिरा, वडे आणि चहा यांवर सारा कार्यक्रम रंगायचा. आज मात्र रेस्टॉरंटमधील पिझ्झा, पास्ता, बर्गर, स्टार्टर प्लेट्स यांनी या साधेपणाची जागा घेतली आहे. खर्च, दिखावा आणि “इम्प्रेशन” यांना प्राधान्य मिळू लागले आहे.

२) सोशल मीडियाची छाया

पूर्वी मुलगा-मुलगी पहिल्यांदा या कार्यक्रमात भेटायचे. आज मात्र भेटीपूर्वीच फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो, व्हिडिओ आणि रील्स पाहून एकमेकांची छाप ठरलेली असते. त्यामुळे प्रत्यक्ष भेटीत नवीनपणा, उत्सुकता कमी झालेली जाणवते.

३) कुटुंब विरुद्ध व्यक्ती

जुन्या काळी “घराणं कसं आहे?”, “नातेवाईक कसे आहेत?”, “संस्कार कसे आहेत?” हे प्रश्न अग्रक्रमावर असायचे. आज मात्र व्यक्तीच्या करिअरच्या संधी, वैयक्तिक स्वातंत्र्य, आवडी-निवडी, विचारसरणी या गोष्टी महत्त्वाच्या झाल्या आहेत. “आपण दोघं जुळतो का?” हा प्रश्न आता अधिक केंद्रस्थानी आहे. त्याहीपेक्षा आजच्या उच्चशिक्षित तरुणांना आपण खूप शिकलो खूप पैसा मिळवतो म्हणजे शहाणे झालो असा समज झालेला आहे .परंतु व्यावहारिक शहाणपण हे अनुभवातून येत असते हे आजच्या पिढीला कळत नाही. पूर्वी वैवाहिक जीवनाचा काडीमोड म्हणजेच घटस्फोट ही फार मोठी गोष्ट समजली जात होती परंतु आज घटस्फोट म्हणजे फॅशन होऊ लागली आहे. त्यामुळे आजचे पालक सहज म्हणून जातात या दीड शहाण्यांच्या नादाला लागण्यापेक्षा तुमचं तुम्हाला कसं पटतंय ते बघा,कसं जुळतंय ते बघा, आणि काय होईल ते पण तुमचं तुम्ही निस्तरा उगाच आमच्या डोक्याला त्रास नको.आम्ही तुमच्यासोबत असेच काहीसे चित्र निर्माण झाले आहे.

४) उपहास आणि विनोदाचे केंद्र

चित्रपट, मालिका, स्टँडअप कॉमेडीमध्ये “कांदे पोहे कार्यक्रम” हा उपहासाचा विषय बनला आहे. आजची तरुणाई या कार्यक्रमाकडे एकप्रकारे गंमत म्हणून बघते. समाज माध्यमांवर यावर आधारित मीम्स, जोक्स, व्हिडिओ सतत झळकत असतात.

५) समाजावर परिणाम

या बदलाचा परिणाम दोन पातळ्यांवर जाणवतो.

एकीकडे आधुनिकतेमुळे तरुणांना स्वतःचे निर्णय घेण्याची मुभा मिळाली, बंधने कमी झाली.तर दुसरीकडे परंपरेतील साधेपणा, आपलेपणा आणि घरगुती वातावरण हरवत चालले आहे. कार्यक्रम आता एका औपचारिक चर्चेऐवजी “डेट” किंवा “कॅज्युअल मीटिंग”सारखा भासू लागला आहे. आता उपवर मुला मुलींचे किंवा नवविवाहितांचे लाजणे मुरडणे हे भाव पाहायला मिळणे  दुरापास्त झाले आहे.


६) पुढील दिशा

प्रश्न असा आहे की – बदल अपरिहार्य आहेत, पण त्यातून आपल्या सांस्कृतिक गंधाचे काय होणार?
आपल्या परंपरेतील साधेपणा जपत आधुनिकतेचा स्वीकार करणे हेच योग्य ठरेल. कांदे पोहे कार्यक्रम हा फक्त एक विनोदी किस्सा न राहता, सांस्कृतिक वारसा जपणारा आणि आधुनिक जीवनशैलीला साजेसा असा तोल राखणारा सोहळा व्हावा, हीच अपेक्षा.


        कांदे पोहे खाणाऱ्यांचे पोट भरतेच, पण त्या कार्यक्रमातून जुळणाऱ्या नात्यांनीच खरं तर मन भरतं. प्रश्न इतकाच आहे – या बदलत्या स्वरूपातही आपण त्या नात्यांची ऊब जपतो आहोत का?

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page