सूर्यकांत जोशी कुडाळ – राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सातारा विधानसभा मतदार संघाबाबत ठेवलेल्या अधांतरी पक्षिय राजकारणामुळे तसेच आमदार शशिकांत शिंदे यांचे कोरेगाव की जावली अशा द्विधा अवस्थेत त्यांचे राजकारण गोत्यात आले असल्याची भावना कार्यकर्त्यांमथून व्यक्त होत आहे.आणि त्याचेच पडसाद राष्ट्रवादी च्या जिल्हा कार्यालयातील राड्यात उमटले.पक्ष नेतृत्वाला सातारा विधानसभा मतदार संघात आ.शिवेंद्रसिंहराजे की आ.शशिकांत शिंदे याबाबत निर्णायक भूमिका घ्यावी लागेल.
विधानसभेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन केलेल्या खेळीत एका दगडात राष्ट्रवादी पक्षासह सह त्यांचे अनेक प्रतिस्पर्धी घायाळ केले आहेत.देशात आणि राज्यात भाजपाच्या असलेल्या लाटेत सातारा मतदार संघात दीपक पवार यांचे वाढत चालले वर्चस्व संपवतानाच भाजपात राहुन राष्ट्रवादीतील वरीष्ठ नेत्यांशी राजेंनी जवळीक कायम ठेवली.राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भविष्यात हा मतदारसंघ शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून पुन्हा आपल्या कडे येईल या उद्देशाने त्यांच्या बरोबर सलोखा ठेवला.राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या या अधांतरी राजकारणाचा फटका पक्षिय पातळीवर आमदार शशिकांत शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत तसेच जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत ही बसला असल्याचे दिसून येते.
कार्यकर्ता हा नेहमी त्याच्या साठीचा सुरक्षित पर्याय निवडत असतो.आमदार शिवेंद्रसिंहराजे हे स्थानिक आमदार आहेत.त्यांचाशी पंगा घेताना कार्यकर्ते दहावेळा विचार करणारच.तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे हे पुन्हा कोरेगाव मध्ये गेले तर आपण उघडे पडू ही भीती कार्यकर्त्याला आहे.स्थानिक विकास कामां बरोबरच जावली चे हक्काचे असणारे किसनवीर व प्रतापगड हे साखर कारखाने बंद असल्याने उसाची समस्या ही आहेच.
राजकारणात महत्वाकांक्षा प्रत्येकालाच असते.आमदार शशिकांत शिंदे हे महत्वाकांक्षी नक्कीच आहेत . आजपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी दिलेली जबाबदारी त्यांनी प्रामाणिक पणे पार पाडून नेत्यांचा विश्वास प्राप्त केला. परिणामी विधानसभा निवडणुकीत हरल्यावर त्यांची तातडीने विधानपरिषदेत वर्णी लागली.आ.शशिकांत शिंदे यांचे जिल्ह्यातील राजकारणात वाढणारे वर्चस्व विरोधकांपेक्षा स्वकियांना सुद्धा न रुचणारे आहे.परिणामी स्वकियांकडुनही त्यांचे पाय ओढले जात आहेत अशी भावना व्यक्त होत आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भारतीय जनता पक्षाचे असले तरीही त्यांनी राष्ट्रवादी च्या अधिपत्याखाली असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षीय अभिनिवेश न आणता त्या आपल्या अधिपत्याखाली ठेवल्या.जावली पंचायत समितीची राष्ट्रवादी ची सत्ता कायम ठेवली.भारतीय जनता पक्षाचे आमदार असले तरीही त्यांचा राष्ट्रवादीशी घरोबा राहिला . गेल्या दोन वर्षांत आ.शिवेंद्रराजेंनी भाजपा आणि राष्ट्रवादी ला समान अंतरावर ठेवून राजकारण केले आहे.
जावली तालुक्याच्या राजकारणात वसंतराव मानकुमरे हे किंग मेकर असल्याचे गेल्या तीस वर्षांत अधोरेखित झाले आहे.शिवसेनेच्या माध्यमातून माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी मानकुमरे यांना तालुक्यातील राजकारणात आणले.त्या नंतर जावली पंचायत समितीवर भगवा फडकवण्यापर्यंत वसंतराव मानकुमरे यांची रणनिती विसरता न येणारी आहे. राजकीय डावपेच,गणिमी कावा,संगठण कौशल्य आणि विरोधकाला ललकारत आव्हान देण्याची ताकत मानकुमरेंमध्ये आहे.साम,दाम,दंड या आयुधांचा वापरही ते वेळेनुसार करत असतात.सद्यस्थितीत तरी मानकुमरे ज्यांच्या कडे तिकडे विजय असेच समीकरण आहे. माजी आमदार सदाशिव सपकाळ यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाचेही खापर मानकुमरे यांच्या वरच फोडले गेले.त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांच्या पराभवासाठी वसंतराव मानकुमरे यांनी च विडा उचलला हे स्पष्ट आहे.
जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत एकिकडे ज्ञानदेव रांजणे वसंतराव मानकुमरे यांच्या माध्यमातून दोन महिन्यांपासून व्यूहरचना करत होते.त्यांना आ.शिवेंद्रसिंहराजेंचे भक्कम पाठबळ होते हे आता लपून राहिले नाही.तर दुसरीकडे आमदार शशिकांत शिंदे पक्ष नेतृत्वाच्या भरोशावर गाफिल राहिले.त्यातच आ.शिंदे यांचा विजय तो विधानसभेचा असो की बॅंकेतील असो तो राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना सुद्धा अडचणीचाच ठरणारा होता.आ.शिंदे विधानसभा जिंकले असते तर ते आज मंञी असते.त्याच बरोबर ते यावेळी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जिंकले असते तर ते चेअरमन पदाचे दावेदार झाले असते ही अंतर्गत सल सुद्धा आ.शिंदेंच्या पराभवाला कारणीभूत ठरणारी आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आ.शिंदे यांनी एकाकी लढत दिली.त्यांचा केवळ एक मताने पराभव झाला.अर्थात जिल्हा बॅंकेची निवडणूक म्हणजे काही जनमताचा पॅरामीटर नाही.ही मॅनेज निवडणूक आहे.असे असले तरीही आ.शिंदे यांना निम्मं मतदान मिळते हे सुद्धा काही कमी नाही.आ.शिंदे यांनी विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर सातारा मतदार संघाची ठोस भूमिका घेतली असती तर कदाचित एक मताचाही फरक राहिला नसता.
आ.शिंदे यांचा सध्या राजकारणातील बॅंड पॅच आहे असंही म्हणावे लागेल.विधान सभे नंतर बॅंकेच्या निवडणुकित सलग पराभव झाला.ही पराभवाची मालिका खंडित केव्हा होणार हे पहावे लागेल.भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि खासदार जिल्हा बॅंकेत राष्ट्रवादी च्या मदतीने बिनविरोध जातात परंतू आ.शिंदे निकराची लढत देऊनही रोखले जाते. आ.शशिकांत शिंदे यांना केवळ पक्ष निष्ठा तारु शकणार नाही हे या निवडणुकीने स्पष्ट केले आहे.बॅडपॅच मध्ये आपले चांगले कर्म नेहमी तारत असते. म्हणूनच आ.शिंदे यांना तात्काळ विधान परिषदेवर संधी मिळाली.
परंतू प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कै राजेंद्र लालसिंगराव शिंदे यांच्या तोंडातून आमदारकीचा घास काढुन घेत आ.शिंदे जावली तालुक्यातील राजकारणात सक्रिय झाले.त्यानंतर कुडाळ येथील लालसिंगराव शिंदे पतसंस्थेच्या तसेच प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीत हस्तक्षेप केला.ही सल कुडाळच्या शिंदे कुटुंबियांत व कार्यकर्त्यां मध्ये आहेच. आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षादेश आणि पक्ष निष्ठेसाठी प्रसंगी आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना गमावले.प्रतापगड सहकारी साखर कारखाना निवडणुकीत मालोजीराव शिंदे यांच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला रोखण्यासाठी प्रयत्न केला.परंतू मालोजीराव शिंदे कारखान्याचे संचालक झाले.आणि आज सौरभ शिंदे यांच्या सोबत राजकारणात सक्रिय झाले.कुडाळ जिल्हापरिषद गटाच्या पोटनिवडणुकीत पक्ष आदेश आणि पक्ष निष्ठा म्हणून मालोजीराव शिंदे यांच्या विरोधात दीपक पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.अशाच पद्धतीने जावली तालुक्यातील अनेक कार्यकर्ते दुखावले गेले.पक्ष निष्ठे बरोबरच भविष्यातील रणनीती हवी. या व अशा झालेल्या चुका बॅंड पॅच मध्यें डोके वर काढत असतात.महत्वाचे कार्यकर्त्यांच्या मनात नेत्याविषयी विश्वास पाहिजे.परंतू कोरेगाव की सातारा जावली या द्विधा अवस्थेत राहुन शक्य होणार नाही.सातारा मतदार संघात सुद्धा अगदी आॅल इज वेल आहे असे नाही.राजकारणात अॅन्टीइनकमसी स्पेस असते.ती सातारा मतदार संघात सुद्धा असणे स्वाभाविक आहे.जिल्हा बॅंकेच्या निकालानंतर आ.शिंदे यांनी जावली च्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे संकेत दिले.त्याचे जावलीकर स्वागतच करतील. जावली आता सातारच्या कवेत आहे.त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे यांना केवळ जावलीच नव्हे तर सातारा पण तितकाच जवळ करावा लागेल.
राजकारणात काट्याने काटा काढावा लागतो.आणि ते आ. शिवेंद्रसिंहराजेंनी वसंतराव मानकुमरे आणि ज्ञानदेव रांजणे यांच्या माध्यमातून केल्याची आता जाहीर चर्चा होत आहे. राजकारणात फारकाळ कोण कोणाचा शञू अथवा मिञ नसतो.जिल्हा बॅंकेच्या या निवडणुकीत आगामी काळात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी बरोबरच जावली तालुक्याची आर्थिक धमनी असणार्या जावली बॅंकेच्या निवडणुकीची बीजे रोवली गेली आहेत.या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांचा राजकीय बॅडपॅच संपणार का हे आगामी काळात पहावे लागेल.
