Thursday, February 19, 2026
HomeTop Newsआखाडे–हुमगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; तर शेती सोडून वन विभागाच्या दारात शेतकरी मुक्काम...

आखाडे–हुमगाव परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; तर शेती सोडून वन विभागाच्या दारात शेतकरी मुक्काम करणार :कमलाकर नाना भोसले यांचा  इशारा
“एकीकडे बिबट्याची दहशत तर दुसरीकडे विजेचा अंधार”


सूर्यकांत जोशी कुडाळ  (प्रतिनिधी):
आखाडे–हुमगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा वावर सुरू असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सतत फोन करूनही वनविभागाकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याची तीव्र तक्रार परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर नाना भोसले यांच्याकडे मांडली.
या पार्श्वभूमीवर आज वनविभागाचे अधिकारी गावात दाखल होताच संतप्त शेतकरी व आखाडे ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घटनास्थळीच श्री. भोसले यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला; मात्र वरिष्ठांचा फोन स्विच ऑफ लागल्याने वातावरण अधिकच तापले. यावेळी श्री. भोसले आक्रमक होत प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका करताना दिसले.
एकीकडे बिबट्याची दहशत असून दुसरीकडे जावली तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळत नाही . त्यामुळे “आई जेऊ देईन आणि बाप भीक मागू देईना” या म्हणीप्रमाणे जावली तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवस्था झाली आहे. निवडणुका जवळ आल्याने नेतेमंडळी व्यासपीठावरून मोठमोठ्या विकासाच्या गप्पा मारत असले तरी आज शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे.जीव धोक्यात घालून शेती कोणासाठी पिकवायची असा संतप्त सवाल भोसले यांनी केला त्याचबरोबर बिबट्याच्या भीतीने मुलांनी शाळेत जाणे बंद केले आहे.
“वनविभागाला बिबट्याचे संरक्षण करायचे असेल तर ते खुशाल करावे; पण शेतकऱ्यांच्या जीविताची हमी कोण देणार?” असा सवाल उपस्थित करत, संघटित शेतकरी उद्यापासून शेतीकाम थांबवून वनविभागाच्या कार्यालयात मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा देण्यात आला. या काळात सर्व शेतकऱ्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाने वन्यप्राण्यांचा तातडीने व प्रभावी बंदोबस्त करावा, अशी मागणी करताना श्री. भोसले म्हणाले की, “भरदिवसा रस्त्यावर वन्यप्राणी फिरताना दिसत असतानाही अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. एखादी झाडाची फांदी तोडली तर शेतकऱ्यांकडून लाखो रुपये दंड वसूल करणारी यंत्रणा, शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान झाले की मात्र गप्प का बसते?”
“जर शासनाला वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करता येत नसेल, तर जगाचा अन्नदाता असलेल्या बळीराजाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा आणि मग वन्यप्राण्यांचे संरक्षण करा,” असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आखाडे गावचे सरपंच सखाराम गायकवाड आप्पा यांच्यासह आखाडे–हुमगाव पंचक्रोशीतील असंख्य संघटित शेतकरी उपस्थित होते. परिस्थितीचा तातडीने आढावा घेऊन ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page