कुडाळ – महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना भेटायला काल नवीमुंबई येथील काही नगरसेवक गेले होते. त्यांच्या बरोबर आमचे चुलतबंधू (आ. शशिकांत शिंदे साहेब यांचे पुतणे) सौरभ शिंदे ही होते. या घटनेची बातमी ABP माझा या वृत्त वाहिनीवर पाहिल्यानंतर शिंदे साहेबांना मानसिक दुःख झाले आहे. खर म्हटलं तर अशा प्रकारची चर्चा होणे हे दुर्दैवी आहे. आमच्या सारख्या कुटुंबाबद्दल अशी चर्चा झाली याचं मला मनापासून दुःख आहे.
आमच्या कुटुंबाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, शिंदे साहेबांचे वडील माथाडी कामगार असताना आमची राजकीय ओळख, आमच्या कुटुंबांची राजकीय ओळख, शशिकांत शिंदे साहेब यांची ओळख ही फक्त शरद पवार साहेबांच्या मुळे झाली. त्यांनी दिलेल्या राजकीय संधीमुळे झाली. माथाडी संघटनेचे काम करत असताना आदरणीय शरद पवार साहेबांनी आमदारकीची थेट तिकीट देऊन शिंदे साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणात संधी दिली. त्यावेळी शिंदे साहेबांनी मेहनत करून, यशस्वी होऊन शरद पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांनी राज्यात मंत्रीपद भूषवले, सातारा जिल्ह्यात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.
या सर्व राजकीय वाटचालीत आमच्या सर्व कुटुंबाची, चुलतेसहित त्यांच्या सर्व कुटुंबाची ओळख ही पवार साहेबांच्या आशिर्वादामुळे झालेली आहे. ज्यामुळे आमची ओळख झाली त्यांना न विसरण्याचा धर्म आम्ही व शिंदे साहेबांनी पाळला आहे. मध्यंतरी आमच्या वर अनेक आघात झाले. तरीही शिंदे साहेबांनी शरद पवार साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही.
ही बाब एका बाजूला, पण कुटुंबातील एका व्यक्तीचे स्टेटमेंट घेऊन शिंदे साहेबांच्या निष्ठेवर आणि त्यांच्या पक्ष निष्ठेबद्दल तडा जात असेल तर याचा विचार प्रत्त्येकाने करणे गरजेचे आहे. नवी मुंबई शहराची जबाबदारी शरद पवार साहेब, अजित पवार साहेब व पक्षप्रमुख यांनी शिंदे साहेबांवर सोपवली. ती दिलेली जबाबदारी शिंदे साहेब प्रामाणिकपणे पणे पार पाडत आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न साहेब करत आहेत.
या प्रयत्नांना अडथळा म्हणूनचं या प्रयत्नांच्या मूळावर घाव घालण्याणा प्रयत्न करण्यात आला. आणि यासाठी कळत न कळत कुटुंबातीलच व्यक्तीचा उपयोग त्यासाठी केला गेला. हे खर तर दुर्दैवी आहे. कोणाशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता टीवी वर अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट दिले गेले. कोणत्याही परिणामाचा विचार न करता हा चुकीचा निर्णय परस्पर घेतला गेला हे कितपत योग्य आहे. अशा प्रकारचे चुकीचे स्टेटमेंट देत असताना त्याचे राजकीय परिणाम काय होतील याचा विचार करणे आवश्यक होते पण दुर्देवाने तसे झाले नाही. कुटुंबातील सदस्यांना विचारत न घेता असे स्टेटमेंट देण्यात आले आहे.
पण हे आत्ताचं नव्हे तर, शिंदे साहेबांचे असलेले नेतृत्व हे सातारा जिल्ह्यामध्ये व नवीमुंबई मध्ये घेरण्याचा प्रयत्न मागच्या काळापासून केला जात आहे. आणि याचाचं दुसरा अर्थ पवार साहेबांचा हा निष्ठावंत शिलेदार, कडवी झुंज देऊ शकतो हे त्याचे प्रत्यंतर आहे. या सर्व घटना घडल्यानंतर कोणी काय निर्णय घ्यायचा तो घेवो पण आम्ही आमची शरद पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षावरील निष्ठा ढळू देणार नाही. आमची निष्ठा शरद पवार साहेबांशी व राष्ट्रवादीशी आहे आणि ती कायम राहील. या संदर्भामध्ये कुठेही संघर्ष करावा लागला तरी निष्ठेमध्ये तडजोड नाही.