म्हसवे गावाला ब वर्ग पर्यटन स्थळ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – आ. शिवेंद्रसिंहराजे.
अजिंक्य तारा कारखान्याने जावलीतील ९० हजार मे.टन ऊसाचे गाळप केले.
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील पर्यटनाला चालणा देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना सुरू करण्यात येणार आहेत.आशिया खंडातील विशाल वडाच्या झाडांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या म्हसवे गावाला ब वर्ग पर्यटन स्थळांचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासन पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल तसेच म्हसवे गावच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
ऊसतोडी मध्ये कुठेही राजकारण न करता अजिंक्यतारा कारखान्याने जावळीतून आज पर्यंत 90 हजार टन ऊस गळीत केले असल्याचे सांगितले. त्यामुळे उसाच्या राजकारणाला कोणीही बळी पडू नका. इतरांना फक्त राजकारण करायचं आहे. शेतकऱ्यांशी त्यांचा देणेघेणे नाही ते उगाच ऊसाच्या नावाने कोल्हेकुई करत आहेत. अशी जोरदार टीका आ.शिवेंद्रसिंहराजेंनी विरोधकांवर केली.
म्हसवे या.जावली येथे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून होत असलेल्या एक कोटी 75 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, भूमिपूजन व सत्कार सोहळ्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात जननी देवी विकास सेवा सोसायटीच्या नवनियुक्त संचालकांचा चेअरमन, व्हाईस चेअरमन , ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचेसह सौ. अरुणा शिर्के यांचा सभापती पदासह पंचायत समिती सदस्य पदाच्या यशस्वी कार्यपूर्ती बद्दल तसेच covid-19 या महामारी मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा स्वयंसेविका यांनाही सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, शिक्षकांचे नेते मच्छिंद्र मुळीक, बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सौ.अरुणा शिर्के यांनी आपल्या पाच वर्षाच्या सदस्य पदाच्या तसेच सभापती पदाच्या काळात उत्कृष्ट काम करून म्हसवे गावा बरोबर गणाचा तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल पुढील काळात त्यांना योग्य संधी देवून घेतली जाईल . म्हसवे गावाच्या ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारत, जुनी बाजार वाट ही कामे प्रामुख्याने मार्गी लावली जातील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अशोक शिर्के यांनी केले. गेल्या पाच वर्षात झालेल्या विकास कामांचा आढावा व भविष्यातील अपेक्षित कामांची मागणी माजी उपसरपंच अजय शिर्के यांनी केले.
जिल्हा बँकेचे संचालक श्री. ज्ञानदेव रांजणे यांनी सोसायटीच्या सर्व विजयी संचालकांचे नवनियुक्त चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले. यापुढील काळात जिल्हा बँकेच्या योजना तळागळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. संदीप परामणे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रतापगड सहकारी साखर संचालक प्रदीप तरडे, पांडुरंग तरडे, उत्तम रांजणे, अजय पाडळे,. सतीश गलगले, मानसिंग भिलारे, विकास धोंडे, अमोल भिलारे, रणजित शिंदे, राजेंद्र शिंदे, चंद्रकांत बेलोशे, उत्तम पवार . समीर आतार यांचेसह म्हसवे ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी सभापती सौ अरुणा शिर्के यांनी आभार मानले. श्री. प्रमोद पवार यांनी सूत्रसंचालन केले.