
सूर्यकांत जोशी कुडाळ –
कण्हेर जलाशयामध्ये मेढा मोहाट पुलानजीक पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या इसमाचा पाण्याचा अंदाज न आल्या बुडून मृत्यू झाला.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी कि शेसराव साहेबराव चव्हाण वय वर्ष ४० रा. देगांव ता. शेलू जि. वर्धा सध्या रा. मार्ली ता. जावली हा इसम गेल्या ४ ते ५ वर्षापासून मार्ली येथे रहिवाशी आहे. दगडी कामाचा त्याचा व्यवसाय होता. मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी कामाला सुट्टी असल्याने सदरची व्यक्ती मेढा बाजार पेठेमध्ये आली होती. त्याच्या सोबत अन्य नातेवाईकही होते असे समजते. दुपारी ३ ते ४ च्या सुमारास सदरची व्यक्ती पोहण्यासाठी पाण्यात उतरली पण पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. घटना घडल्या पासून मेढा पोलिसांनी स्थानिकांचे मदतीने शोधमोहीम राबवली. मात्र आज दि. १८ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ च्या सुमारास सहयाद्री टेकर्स महाबळेश्वर चे संजय पार्टे ( सर ) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी दिपक जाधव, सर्जेराव खुटेकर, सुहास बैलकर, अनिल पवार, पांडुरंग जाधव, विजय शेलार, तेजस शेलार, रोहिदास पवार, बापु खुटेकर यांनी मृत देह शोधून काढण्यात यश मिळविले.
जाग्यावरच पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेढा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. अकस्मीत मृत्यू अशी मेढा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पो.ना. धीरज बेसके करत आहेत.
