सूर्यकांत जोशी कुडाळ 9421214450
भारतीय संस्कृतीची खरी ताकद तिच्या परंपरांत आहे. अंगणातल्या रांगोळ्या, गाणी म्हणणाऱ्या महिला व मुली, पाटावर काढलेली हत्तीचे प्रतिमा म्हणजे साक्षात गजान्त लक्ष्मीचे प्रतीक व त्याभोवती एकत्र आलेल्या सख्या आणि शेवटी मिळून वाटून खालेली खिरापत – हे दृश्य पाहिलं की आपल्याला जाणवतं, आपली मुळे अजूनही जमिनीत घट्ट रोवलेली आहेत.
दरवर्षी अश्विन महिन्यात हस्त नक्षत्र सुरू झाले की ग्रामीण भागात प्रत्येक गल्ली बोळात महिला व मुली अंगणात येऊन हा खेळ मांडण्याची जुनी परंपरा लुप्त होऊ पहात आहे. या मनाला आनंद मिळवून देणाऱ्या आणि समाजात एकोपा जपणारी ही परंपरा म्हणजे कुडाळच्या सखी महिला मंचने नुकताच साजरा केलेला भोंडला हा याचाच जिवंत पुरावा ठरला. विस्मृतीत जाणाऱ्या या परंपरेला नव्या पिढीपुढे आणून त्यांनी दाखवून दिलं की परंपरा जिवंत ठेवली तरच संस्कृती टिकते.
ज्या ठिकाणी ध्येय आणि विचार चांगले असतात तिथे केवळ आनंद आणि प्रेमच वास करते. मनामध्ये एकमेकांविषयी कोणता ही स्वार्थ, द्वेष, मोह, मत्सर न ठेवता केवळ भारतीय प्राचीन संस्कृतीचे जतन व संवर्धन आणि पुढील पिढीला योग्य संस्कार त्याचबरोबर एकमेकींच्या सुखदुःखात जिवाभावाची साथ देण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेल्या महिलांचा आदर्शवत असा सखी महिला मंच आहे. त्यामुळे या ठिकाणी शिक्षण, व्यवसाय,पद,प्रतिष्ठा,पैसा याचा कोणताही अहंभाव नाही. या महिला मंच मध्ये डॉक्टर, इंजिनिअर,वकील छोटे मोठे व्यावसायिक, गृहिणी, शेतकरी अशा सर्व स्तरातील सखी अगदी जिवाभावाने एकत्रित आल्याचे दिसून येते.
भोंडल्यातील गाणी ऐकताना एखाद्या मुलीच्या चेहऱ्यावर उमटलेलं निरागस हास्य, खिरापतीत कोण काय आणलं हे ओळखताना झालेली चढाओढ आणि शेवटी मिळून खाल्लेल्या गोळ्यांचा आनंद – हे सगळं दृश्य म्हणजे एक आनंदोत्सवच होता. त्या क्षणी कुणी मोठं, कुणी लहान, कुणी श्रीमंत, कुणी गरीब नव्हतं. सगळे समान, सगळे सखे – हीच खरी भारतीय संस्कृतीची ओळख.
आजच्या डिजिटल युगात जिथे मुलं मोबाईलच्या पडद्यामागे हरवली आहेत, तिथे हा भोंडला त्यांना एकत्र येण्याचा, गाणी म्हणण्याचा, हसण्याचा, वाटून खाण्याचा धडा शिकवतो. हीच खरी शिक्षणाची शाळा आहे. पुस्तकी शिक्षणाने ज्ञान मिळतं, पण अशा परंपरांनी माणुसकी, सामूहिकता आणि संस्कार मिळतात.
सखी महिला मंचने घेतलेली ही पुढाकारवजा जबाबदारी समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी नव्या पिढीला केवळ एक खेळ दाखवला नाही, तर त्यांना सांगितलं की – “आपल्या संस्कृतीची मुळे जपली तरच जीवन फुलणार, आणि आपण कुठेही गेलो तरी या मातीशी आपली नाळ कधीही तुटणार नाही.”
कुडाळच्या भोंडल्याचा हा सुंदर उपक्रम आपल्याला एकच संदेश देतो –परंपरा जपा, संस्कृती जोडा, आणि नव्या पिढीला आनंद व संस्कारांचा अमूल्य वारसा द्या.
