सूर्यकांत जोशी | कुडाळ
गेले पन्नास वर्षे कुडाळ विभागातील जनतेला जावली तालुक्याच्या मुख्य ठिकाणाशी जोडणाऱ्या कुडाळ येथील कुडाळी (निरंजना) नदीवरील जुन्या पुलाच्या पाडकामाला अधिकृत सुरुवात झाली आहे. या कामकाजादरम्यान संभाव्य धोके टाळण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले आहे.
हे हि वाचा –
पन्नास वर्षांच्या अविरत सेवेला द्या अखेरचा निरोप : निरंजना (कुडाळी )नदीवरील पुलाची भावपूर्ण हाक
पाडकाम सुरू असल्याने वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या ऊस वाहतुकीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर व ट्रक चालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. उसाने भरलेल्या दोन ट्रॉल्या एकाच वेळी नेणे शक्य नसेल, तर टप्प्याटप्प्याने वाहतूक करावी. आवश्यक तेथे वेगमर्यादा पाळून सुरक्षित अंतर राखावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

या पाडकामानंतर नव्या पुलाच्या बांधकामाला गती देण्यात येणार आहे. पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कागदोपत्री दीड वर्षांचा कालावधी असला, तरी कोणताही अडथळा न आल्यास पावसाळ्यापूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा मानस संबंधित ठेकेदाराने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिक, वाहनमालक आणि चालकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन समीर आतार यांनी केले आहे.
दरम्यान, पाडकामातून निघणारे सर्व स्क्रॅप साहित्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्यात येणार असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची संपूर्ण जबाबदारी बांधकाम विभागाचीच राहील, असेही ठेकेदाराकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी, अपघात व गैरसोयी टाळण्यासाठी नागरिकांनी सूचना पाळाव्यात आणि पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.
