सूर्यकांत जोशी कुडाळ – कुडाळ ग्रामपंचायतीत सदस्यांना विचारात न घेता मनमानी कारभार सुरु आहे. गावातील विकास कामे ठराविक ठेकेदाराला देण्यात येत असून ही सर्व कामे निकृष्ठ झाली आहेत. तर मंजुरी पूर्वीच अनेक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अशा एकाधिकार शाही मुळे गावाचे आर्थिक नुकसान होत आहे. सत्तेत असल्याने या पापाचे नाहक बळी होण्यापेक्षा आम्ही सत्तेतून फारकत घेत आहोत असे बहुजन विकास आघाडीच्या वतीने प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे.बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी पाठिंबा काढल्याने कुडाळचे सरपंच पद अल्पमतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दीड वर्षापूर्वी कुडाळ ग्रामपंचायत ची पंधरा जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कौल दिला होता.या निवडणुकीत सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील रयत पॅनलच्या सात,माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या सहकार पॅनल व बहुजन विकास आघाडीला प्रत्येकी चार जागा मिळाल्या होत्या.त्यामुळे त्यावेळी सत्ता नाट्य चांगलेच रंगले होते.
गावाच्या विकासासाठी रयत पॅनल सोबत येण्याचा निर्णय बहुजन विकास आघाडीने घेतल्याचे सांगण्यात आले. आघाडी करताना समन्वय्याने कारभार चालावा यासाठी दोन्ही पॅनलच्या वतीने दहा जणांची कोअर कमिटी बनवण्यात आली होती पण या कमिटीची कधीही बैठक होत नाही.तसेच त्यानंतर आमच्या सदस्यांना विश्वासात न घेता कारभार सुरु केला. ग्रामसभा व मासिक मिटिंगचे निर्णय परस्पर बदलेले जात आहेत.झालेली कामे ठराविक ठेकेदाराला देण्यात आली असून सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. सत्ताधारी व शासकीय अधिकारी सामील आहेत.सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून बहुजन विकास आघाडीचे सदस्य रयत पॅनलचा पाठिंबा काढत आहोत.असे प्रसिद्धी पत्रक बहुजन विकास आघाडीने पत्रकांना दिले आहे. या कारभारात सुधारणा न झाल्यास प्रसंगी उपसरपंच पदाचाही राजीनामा देऊ असे यावेळी सांगण्यात आले.
पॅनल प्रमुख हेमंत शिंदे, संजय शिंदे, प्रकाश दादा रासकर,उप सरपंच सोमनाथ कदम,राहुल ननावरे,वीरेंद्र शिंदे,गौरव शिंदे,संजय शेवते, अजित शिराळकर, महेश शिंदे,जावली बँकेचे संचालक चंद्रकांत गवळी,धनंजय पोरे,विलास कांबळे गुरुजी, रवींद्र शिंदे, समीर डांगे,व कार्यकर्ते उपस्थित होते.