Thursday, February 19, 2026
HomeTop Newsकुडाळ परिसरात चोरट्यांचा धुमाकूळसशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात महिलेवर चाकूने वार ; भीतीचे वातावरण

कुडाळ परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात महिलेवर चाकूने वार ; भीतीचे वातावरण

दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तानाजी कदम यांच्या पत्नी.



सूर्यकांत जोशी | कुडाळ
जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. सात ते आठ दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेवर चाकूने वार करण्यात आला असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेची नोंद मेढा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सुमारे बाराच्या सुमारास कुडाळजवळील पुनर्वसित पानस गावात चोरट्यांनी बंद घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीच हाती न लागल्याने त्यांनी कुडाळचे उपसरपंच सोमनाथ कदम यांच्या शेतातील घराचा कोंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेथेही अपयश आल्याने चोरट्यांनी जवळच असलेल्या तानाजी विठ्ठल कदम यांच्या घराकडे मोर्चा वळवला.
त्यावेळी घरात तानाजी कदम, त्यांची पत्नी धनश्री आणि मुलगी उपस्थित होते. सुरुवातीला दरोडेखोरांनी दरवाजा ठोठावून उघडण्याचा प्रयत्न केला. आतून “कोण आहे?” अशी विचारणा होताच त्यांनी दरवाजाला लाथा मारून तोडण्याचा प्रयत्न सुरू केला. दरवाजा कोसळण्याच्या बेतात असतानाच तानाजी कदम यांच्या पत्नीने तो रोखण्याचा प्रयत्न केला. दरम्यान तानाजी कदम यांनी दरोडेखोरांना  प्रतिकार करण्यासाठी साठी हातात फावडे घेतले. हे पाहून दरोडेखोरांनी थेट त्यांच्या पत्नीवर हल्ला चढवत हातावर चाकूने वार केला.
याचवेळी तानाजी कदम यांच्या मुलीने शेजाऱ्यांना फोन करून मदतीसाठी बोलावल्याचे दरोडेखोरांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

जखमी धनश्री कदम यांना  कुडाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार मिळाले नाहीत.त्यामुळे सोमर्डी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या हाताला आठ ते दहा टाके घालण्यात आले.घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने घटनास्थळी भेट दिली. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एकीकडे सशस्त्र दरोड्यामुळे भीतीचे वातावरण असताना, दुसरीकडे जखमी महिलेवर तातडीने उपचार मिळण्यात आलेले अपयश आणि गुन्ह्याचे नोंद करण्यासाठी मेढा पोलीस ठाण्यापर्यंत  आपत्तीग्रस्ताला  धावपळ करण्याची सक्ती हे सर्वसामान्य नागरिकांचे दुर्दैव ठरत आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कुडाळ पोलीस दूरक्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद रिक्त आहे. त्यामुळे सक्षम अधिकाऱ्याअभावी कुडाळ पोलीस दुरक्षेत्रात गुन्ह्यांची नोंद केली जात नाही त्यामुळे जनतेचे प्रचंड गैरसोय होत आहे. या दूर क्षेत्रात  पुरेसा पोलीस कर्मचारी उपलब्ध नाही. याबाबत वारंवार मागणी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

गेल्या काही वर्षांपासून कुडाळ परिसरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत असून अद्याप एकाही चोरीचा छडा लागलेला नाही. पूर्वी बंद घरे लक्ष्य करणारे चोरटे आता थेट कुटुंबांवर सशस्त्र हल्ले करू लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. जावली तालुक्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता आणि सुरक्षिततेबाबत तातडीने सखोल चौकशी व ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page