
सूर्यकांत जोशी कुडाळ -कुडाळ ता. जावली येथील आगाचा ओढा ते शेते फाटा या भागातील बेंदाड नावाच्या शिवारातून जाणारा शेतीसाठी अत्यंत महत्व पूर्ण असणारा रस्ता दरवर्षी पावसामुळे खराब होतो.त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे हा कच्चा रस्ता बारमाही वाहतकीयोग पक्का करण्यात यावा या आशयाचे निवेदन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ व शेते येथील ग्रामस्थांनी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले आहे.
येथील शेकडो एकर शेती धोम कालव्याच्या क्षेत्रात ओलिताखाली येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस तसेच अन्य बागायती पिके घेतली जातात रस्त्याच्या गैरसाईमुळे तयार शेतीमाल बाहेर काढताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.दरवर्षी शेतकऱ्यांना स्व निधीतून या रस्त्याची डागडूजी करावी लागते. रस्त्या अभावी पावसाळ्यात बऱ्याचदा ही पिके न काढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांच्या या सर्व व्यथा सौरभ शिंदे यांनी यावेळी नामदार शिवेंद्रसिंहराजे यांना सांगितल्या. त्यानंतर शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन नामदार शिवेंद्रसिंहराजेंनी याबाबत तातडीने चौकशी करून हा रस्ता तातडीने होण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले.