
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यातील कुडाळ येथील जागृत देवस्थान श्री पिंपळेश्वर श्री वाकडेश्वर यांच्या नवरात्रोत्सवास सोमवार पासून मोठ्या भक्ती आणि श्रद्धेने उत्साहात प्रारंभ झाला आहे. मंदिरात सोमवारी सकाळी घट स्थापना करण्यात आली. नवरात्र उत्सवानिमित्त संपूर्ण मंदिराला आकर्षक विद्युत रोशनाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.
जावली तालुक्यातील कुडाळ येथे निरंजना नदीकाठी श्री पिंपळेश्वर व श्री वाकडेश्वर देवांचे जागृत देवस्थान आहे. या मंदिरात भगवान शिव शंकराचे स्वयंभू पिंडी आहे.
श्रींच्या आरती मधील “उत्तरेचा दिनानाथ दक्षिणे आला, रत्नासुर वधावया,जनाभक्ता पावला आरती क्षेत्रपाला “ याचा अर्थ पाहिला तर उत्तरेचा दीनानाथ म्हणजे श्री काशी विश्वेश्वर हे दक्षिणेला रत्नासुर राक्षसाचा वध करण्यासाठी निघाले असता ते कुडाळ येथील निरंजना नदी काठी पिंपळ व वडाच्या झाडांचे वन असणाऱ्या ठिकाणी थांबले होते. येथील जनतेच्या भक्तीला प्रसन्न होऊन ते शिवलिंगाच्या स्वरूपाने प्रकट झाले. मंदिरात असणारी शिवपिंडी ही काशीविश्वेश्वर स्वरूप आहे. आणि येथील जनतेच्या रक्षणासाठी काशीविश्वेश्वरांनी जे दोन भैरव नेमले त्यांचे नाव श्री पिंपळेश्वर व श्री वाकडेश्वर आहे.
ही रूपे सुद्धा भगवान श्री शिव शंकराची आहेत.या देवांचे शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव आणि मेरूलिंगचे मेरूलिंगेश्वर यांचाही ऋणानुबंध आहे. त्यामुळेच या मंदिरात शिवपिंडीच्या बाजूला पितळेच्या ज्या मूर्ती आहेत त्यामध्ये एका बाजूला शंभू महादेव आणि दुसऱ्या बाजूला मेरूलिंगेश्वर आहेत अशा प्रकारे या मंदिरात भाविकांना पंचेश्वराचे दर्शन होते.अशी श्रद्धा व आख्यायिका आहे.
श्रींचे नवरात्र अत्यंत धार्मिक श्रद्धेने केले जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेला मंदिरात तसेच बहुतांश प्रत्येकाच्या घरी घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो.श्रींचे नवरात्र करणाऱ्यांना नऊ दिवस तिखट मीठ वर्ज्य असते. केवळ फल आहार घेऊन नऊ दिवस नवरात्र करावे लागते. या कालावधीत नवरात्र करणारा सुचिर्भुत राहून देवाची पूजा अर्चना करत असतो. दररोज देवदर्शन करून देवांना अकरा प्रदक्षिणा घालण्याचा प्रघात आहे. ज्यांना वय अथवा शारीरिक अस्वास्थ्यामुळे नऊ दिवस नवरात्रीचा उपवास करणे शक्य नसते. ते लोक नवरात्रीचा पहिला व शेवटचा दिवस(याला उठता बसता नवरात्र म्हणतात) उपास करून आपली श्रद्धा जोपासतात.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी अर्थात ललिता पंचमी दिवशी पाचवी माळ असते या दिवशी देवांच्या पंचारतीची मिरवणूक गावातून काढण्यात येते. या पंचारतीच्या माध्यमातून गावातील विविध मंदिरात आरती केली जाते. या दिवशी श्रींच्या दसऱ्या दिवशी सिमोलंघन कोणत्या दिशेला होणार याचा निर्णय होतो. नवरात्रातील अष्टमी दिवशी श्रींची मंदिराभोवती पालखीतून प्रदक्षिणा केली जाते. नवमीला नवरात्र समाप्ती व घट ठेवले जातात. यावेळी प्रत्येक घरात गोंधळी आरती करतात. या दिवशी डवर व त्रिशूल यांच्या पूजेला विशेष धार्मिक महत्व आहे.
दसऱ्या दिवशी दुपारी श्रींची सिमोल्लंघणासाठी शाही मिरवणूक निघते. देव सिमोल्लंघण करून आल्यानंतर संपूर्ण गावातून देवांना ओवाळणी केली जाते. श्रींना पुन्हा मंदिरात जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ होते. त्यामुळे हा सिमोल्लंघन सोहळा सुमारे चोवीस तास सुरु असतो. हा डोळ्याची पारणे फेडणारा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी होत असते.
नवरात्रीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दुर्गादौडचे आयोजन करण्यात येते. या उपक्रमात दररोज सकाळी शेकडो शिवभक्त युवक युवती सहभागी होतात.