सूर्यकांत जोशी कुडाळ – निवडणुकीत तडजोडी करुन एकत्र येता तसे जावली तालुक्यात क्रिडा संकुलाच्या उभारणी साठी गटतट बाजूला ठेवून सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यावे अशी साद जावली तालुक्यातील क्रीडा प्रेमींनी कडून नेत्यांना घालण्यात येत आहे.
जागे अभावी गेली पंचवीस वर्षे क्रीडासंकुल होऊ शकले नाही.शासकीय जागा उपलब्ध नसेल तर क्रीडा संकुलासाठी शासनाने बाजार भावाप्रमाणे जमीन खरेदी केली पाहिजे .तसे शक्य नसल्यास प्रतापगड कारखाना निवडणुकीत संस्थापक सहकार पॅनलच्या व्यासपीठावरील दिग्गज नेते पाहिल्यावर या सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला तर क्रीडा संकुलासाठी पाच दहा एकरचे माळरान खरेदी करणे फारसे कठीण नाही अशीच भावना क्रीडा प्रेमींनी व्यक्त केली. या चांगल्या कामासाठी जावली तालुक्यातील सर्वसामान्य जनता आपला नक्कीच खारीचा वाटा उचलेल असा विश्वास क्रीडा प्रेमींकडुन व्यक्त केला जात आहे.
१९९५ साली शिवसेना व भारतीय जनता पक्ष युती सरकारच्या काळात ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व सहाय्य मिळावे या हेतूने तालुका स्तरावर क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.त्यावेळी क्रीडा संकुलासाठी पंचवीस लाखांचा निधी सुद्धा उपलब्ध करण्यात आला होता.जावली तालुक्यात क्रिडा संकुलाच्या उभारणी साठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाले.क्रीडा संकुलासाठी जागांचे सर्वेक्षण करण्यात आले.कुडाळ येथील श्री पिंपळेश्वर मंदिराशेजारी व जागा निवडण्यात आली.त्यानुसार ती जागा जिल्हा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली होती.
या जागेवर रनिंग ट्रॅक बसत नसल्याने पुढील कामकाज थांबले.या शिवाय या जागेवर असणार्या घरांच्या पुनर्वसनाची ही अडचण होती. त्याच दक्रम्यान संबंधित अधिकाऱ्यांना रिंग ट्रॅक बसत नसेल तर किमान इन डोअर गेम साठी तरी क्रीडा संकुल उभारण्याची मागणी कुडाळ ग्रामस्थांनी केली.परंतू या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.यासर्व अडचणींवर मात करण्याचा अथवा पर्यायी जागा पाहण्याचा गेल्या पंचवीस वर्षांत फारसा प्रयत्न क्रीडा विभागानेही केला नाही.तशी राजकीय इच्छाशक्ती सुद्धा दिसुन आली नाही.
सहा महिन्यांपूर्वी मेढा विभागात क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.पण त्याच वेळी क्रीडा संकुल कुडाळ विभागात झाले पाहिजे असा आग्रह या विभागातील नेत्यांनी धरला.त्यानंतर पुन्हा क्रीडा संकुल उभारण्याच्या हालचाली थंडावल्या आहेत.
जावली तालुक्यात अनेक गुणवंत खेळाडू आहेत.आजपर्यंत विविध क्षेत्रात जावली तील युवकांनी आपले नैपुण्य दाखवले आहे.राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर येथील क्रीडा पटुंनी चमकदार कामगिरी केली आहे.या युवा खेळाडूंना क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जागा आणि योग्य प्रशिक्षण मिळाले तर येथील खेळाडू जावलीचा लौकिक अटकेपार नक्कीच नेहतील.
जावलीतील राजकीय नेत्यांचे क्रीडा पटुंवर निश्चितच प्रेम आहे.दरवर्षी पावसाळा संपला की अनेक नेते क्रिकेट सामने तसेच खो खो, कब्बडी यासह अनेक खेळांसाठी हजारो रुपयांची बक्षिसे जाहीर करुन खेळाडूंना प्रोत्साहन देतात.परंतू खेळांसाठी आवश्यक मैदान व प्रशिक्षण मिळत नाही.तसेच सुविधा उपलब्ध होत नाहीत.सध्या कुडाळ येथील शेती उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर क्रिकेट सामने भरविले जातात.परंतू क्रीडा पटुंना आपले हक्काचे मैदान उपलब्ध होणे आवश्यक आहे.
शासकीय जागा उपलब्ध नसेल तर जागा खरेदी करा.
आज पर्यंत क्रीडा संकुलासाठी शासनाच्या जागा शोधण्यात पंचवीस वर्षांचा कालावधी लोटला आहे.जावली तालुक्यात साखर कारखाना उभारणीसाठी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांनी सोनगाव, करंदोशी, नेवेकरवाडीचा माळ सभासदांच्या सहकार्याने खरेदी करुन कारखाना उभा केला. तसं आजी माजी आमदार , खासदार,व इतर सर्व पदाधिकारी सक्षम आहेत.सर्वांनी एकत्र येऊन एखादा पाच दहा एकरचे माळरान क्रीडा संकुलासाठी खरेदी करावा अशी मागणी क्रीडा प्रेमींनी केली आहे.या चांगल्या कामासाठी जावली तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आपला नक्कीच खारीचा वाटा उचलेल.या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा पटु घडावेत अशी अपेक्षा जावलीतील जनतेतून व्यक्त होत आहे.
