कुडाळ | प्रतिनिधी
खर्शिबारामुरे येथील न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री. मोहन आप्पा देशपांडे हे होते.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक युवराज पार्टे, दिलीप यादव, शंकर गावडे, प्रमोद कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा दिली. “जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय निश्चित करा आणि सातत्याने प्रयत्न करा,” असा मोलाचा संदेश त्यांनी दिला.
शालेय मराठी विषयात पारंगत असलेल्या सौ. साळुंखे मॅडम यांनी आपल्या प्रभावी शैलीत विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर यश संपादन करण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप युवराज पार्टे व सुखांत गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गावचे ह.भ.प. संतोष महाराज भांदीरगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कानमंत्र देत नैतिक मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गुरव सर यांनी विद्यार्थ्यांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा देत सातत्यपूर्ण अभ्यासाचे महत्त्व सांगितले. अध्यक्षीय समारोपात श्री. देशपांडे आप्पा यांनीही विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग्य रीतीने पार पडले असून, शाळेचे इंग्रजी शिक्षक श्री. जमादार सर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
समारंभामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते.
खर्शीबारामुरे हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
- Advertisment -