
शनिवार दि. 27/09/2025 रोजी दुपारी 4 वा.
स्थळ – शाहूकला मंदिर सातारा
समाजातील पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न
साताऱ्यातील शाहू कला मंदिरात 27 सप्टेंबर रोजी होणारा अमृत संस्थेचा महामेळावा हा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
“खुल्या प्रवर्गाची” उपेक्षा अमृतच्या माध्यमातून थांबावी
आजवर शासनाच्या योजनांचा लाभ प्रामुख्याने आरक्षित गटांपुरता मर्यादित राहिला. ब्राह्मण, राजपूत, अग्रवाल, माहेश्वरी, पटेल, राजपुरोहित, सिंधी व इतर आरक्षणाचा लाभ मिळत नसलेल्या घटकांना कुठल्याही प्रकारची थेट शासकीय मदत मिळाली नाही. यामुळे सामाजिक आणि आर्थिक असंतुलन वाढत गेले. ही पोकळी ओळखून अमृतने स्वयंरोजगार प्रशिक्षण, व्याज परतावा, कृषी उद्योग प्रशिक्षण, अमृत कलश अशा योजना सुरू केल्या आहेत.
नेतृत्वाचा पाठिंबा
या मेळाव्यात मा. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री) व संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. विजय जोशी मार्गदर्शन करणार आहेत. या उपस्थितीमुळे उपक्रमाला सामाजिकच नव्हे तर राजकीय बळही मिळाले आहे.
आव्हान पारदर्शक अंमलबजावणीचे
अर्थातच, कोणत्याही योजनेचा यशस्वी परिणाम हा लाभार्थ्यांच्या जीवनात प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यात असतो. घोषणांनी वा मेळाव्यांनी उन्नती होत नाही; तर योजना पारदर्शकतेने, काटेकोरपणे व सर्वसमावेशकपणे राबवल्या तरच या प्रयत्नांचे सार्थक होईल.
अमृतचा महामेळावा हा सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक महत्त्वाची पायरी आहे. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना नवी उभारी देण्याची क्षमता यात आहे. मात्र या उपक्रमाने फक्त अपेक्षांची धुंदी निर्माण न करता, प्रत्यक्षात जीवनमान उंचावले, तरच हा “आशेचा किरण” खऱ्या अर्थाने उजळून निघेल.

