Thursday, February 19, 2026
HomeTop Newsजंगी शक्तीप्रदर्शनात जयश्री गिरी यांचा उमेदवारी अर्ज दाखलकुडाळ जिल्हा परिषद गटात गिरी...

जंगी शक्तीप्रदर्शनात जयश्री गिरी यांचा उमेदवारी अर्ज दाखल
कुडाळ जिल्हा परिषद गटात गिरी दाम्पत्यावर जनतेचा विश्वास



सूर्यकांत जोशी | कुडाळ
कुडाळ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षातील अंतर्गत विरोध, राजकीय अडथळे आणि समीकरणांना न जुमानता अखेर जनतेचा विश्वास, सामाजिक कार्याची शिदोरी आणि वरिष्ठ नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा यांच्या जोरावर गिरी दाम्पत्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी टाकलेल्या विश्वासामुळे जयश्री गिरी यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळाली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करताना कुडाळ परिसरात अभूतपूर्व जनसमुदाय एकवटला होता.
गिरी दाम्पत्याचा समाजाशी असलेला थेट संपर्क, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची भूमिका आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्य यामुळे आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक व नागरिक उपस्थित होते. कुडाळ गटात झालेल्या या जंगी शक्तीप्रदर्शनामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले.
नेहमी विरोधकांना आपल्या गोड वाणीने आणि राजकीय चातुर्याने राजी करण्यात पटाईत असलेले सुहासदादा गिरी यांनी मानकुमरेसह विरोधकांना धोबीपछाड देत अखेर भाजपाचे तिकीट मिळवले. त्यानंतर आपल्या असंख्य समर्थकांसह नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या सुविद्य पत्नी व माजी सभापती जयश्रीताई गिरी यांचा कुडाळ जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुहासदादा गिरी आणि जयश्रीताई गिरी ही जावळीच्या राजकीय पटलावर कायम चर्चेत असणारी जोडी आहे. पती-पत्नी दोघांनीही जावळी पंचायत समितीच्या सभापतीपदी आपला कार्यकाळ गाजवत इतिहास घडवला असून असे दांपत्य पुन्हा होणे कठीण असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे भाजपाकडून तिकीट मिळण्यास काही विरोधकांनी तीव्र विरोध दर्शविला होता. मात्र हा विरोध शांत करण्यात सुहासदादा गिरी यांनी आपल्या राजकीय कौशल्याने यश मिळवले.
आज उमेदवारी अर्ज दाखल करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह वसंतराव मानकुमरे, ज्ञानदेव रांजणे, सौरभ शिंदे आदी मान्यवर नेते, असंख्य कार्यकर्ते व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव असल्याने, कुडाळ गटातून जयश्री गिरी निवडून आल्यास त्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळणार असून त्यामुळे कुडाळ तालुक्यासाठी नवा राजकीय अध्याय सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page