सातासमुद्रा पलिकडे जपली आपली धार्मिक परंपरा
संदीप गाढवे केळघर, ता:२६:खरं तर गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने साजरा करण्यात येणारा प्रमुख सण.१०० वर्षांपूर्वी १९२० मध्ये लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सर्व जण एकत्र येतील,यातून एकोपा, सामाजिक बंधुता वाढावी हाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून लोकमान्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. आज १०० वर्ष झाली कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या मात्र भाविकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही.
सातासमुद्रापार असलेल्या इंग्लंड देशातील लंडनमध्येही पारंपरिक पद्धतीने व उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो आहे. केळघर ता. जावळी येथील उच्च शिक्षित गणेश वसंतराव गाडवे हे नोकरीनिमित्त लंडन येथे स्थायिक आहेत. गेल्या १० वर्षांपासून ते लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. दरवर्षी लंडनमध्ये स्थायिक असलेले मराठीजन गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सव निमित्ताने महाराष्ट्र च्या अनोख्या परंपरेची जगाला ओळख होत असते. मात्र यावर्षी कोरोना विषाणू चा कहर असल्याने लंडनमधील गणेशोत्सव साजरा करायला मर्यादा आल्याचे गणेश गाडवे यांनी सांगितले. सोशल डिस्टन्स चा अवलंब करुन यावर्षी लंडनमध्ये बाप्पाचा उत्सव सुरू आहे. गणेश व त्यांची पत्नी मोनिका हे दोघेही लंडनमध्ये नोकरी करत आहेत. आपल्या संस्कृतीचा विसर न पडता ते गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करतात.
विशेष म्हणजे यावर्षी त्यांनी बसवलेली गणेश मूर्ती शाडू पासून बनवली असून पर्यावरण पूरक गणेशोत्सव त्यानिमित्ताने साजरा होतोय. प्रसादाचे मोदक, लाडू ही घरीच तयार केले जातात. लंडनमध्ये, दुर्वा, खाऊची पाने ही सहजपणे उपलब्ध होतात. गेल्या वर्षी त्यांनी शिवाजी महाराजांच्या किल्याची प्रतिकृती गणेशोत्सव साजरा करताना साकारली होती.तसेच लंडन ब्रिज ची देखावा मागील वर्षी केला होता.आपल्या घरापासून लांब असून देखील गोऱ्या साहेबांच्या देशात मराठमोळा गणेशोत्सव तिथल्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे. लंडनमधील हा अनोखा मराठमोळा गणेशोत्सव आज महाराष्ट्र राज्याच्या परंपरेची साक्ष देत आहे.