
सूर्यकांत जोशी कुडाळ – नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जावली तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे एक हाती सत्तेचे स्वप्न भंगले असून या निवडणुकीत आश्चर्यकारकरीत्या शिवसेनेने एक गट व दोन गण काबीज केले. राष्ट्रवादीने एका गणावर आपली मोहर उठवली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या निवडणुकीत जावली तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते परंतु मतदारांनी धनशक्तीला नाकारून जनशक्तीला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले.
जावली तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी दोन गटात व तीन गणात विजय संपादन केला.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र या निवडणुकीत भाजपच्या एक हाती सत्तेला धक्का देत म्हसवे गणात आपल्या उमेदवाराला विजय मिळवून दिला. कुसुंबे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वाखाली दोन गणांसह संपूर्ण गट काबीज केला.
सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अखेरच्या क्षणी मात्र अत्यंत रंगतदार व अटीतटीची झाली.शहकाटशहाचे चे राजकारण आणि साक्षात अन्नपूर्णा व लक्ष्मी दर्शन यामुळे मतदारांनीही या निवडणुकीचा मनमुराद आनंद लुटता आला.
कुडाळ जिल्हा परिषद गट भाजपाने काबीज करताना सौ जयश्री मणिलाल गिरी यांनी तब्बल 6716 एवढ्या विक्रमी मतांनी विजय संपादन केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद ओबीसी महिला राखीव असून या पदावर गिरी यांनी आपला दावा अधिक भक्कम केला आहे. या निवडणुकीत जयश्री गिरी यांना 11,917 मते मिळाली राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार सौ.पूनम प्रशांत नायकुडे यांना 5201 मते मिळाली तर अपक्ष सौ.जयश्री संजय शेवते यांना 2367 मते मिळाली. 300 मतदारांनी नकारात्मक (नोटा )मतदान केले.
निवडणूक लागल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीत कुडाळ गणात अत्यंत चुरशीची निवडणूक होईल असे गृहीत धरण्यात आले होते.परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सौरभ राजेंद्र शिंदे यांनी आघाडी घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र शिंदे यांचा 2077 मतांनी दारुण पराभव केला. सौरभ राजेंद्र शिंदे भाजप 5209, राजेंद्र रामचंद्र शिंदे (राष्ट्रवादी) 3132, प्रशांत मारुती तरडे (शिवसेना) 609, राजेंद्र खाशाबा शेवते (अपक्ष) 193, तर नोटा ला 138 मते मिळाली.
सायगाव गणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार चारुशीला विवेक पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवार साक्षी विजय देशमुख यांचा 2085 मतांनी पराभव केला.हा पराभव दीपक पवार यांच्या होम ग्राउंड वर झाल्यामुळे त्यांना राजकीय शह देण्यात भाजपाला यश आले आहे. या निवडणुकीत साक्षी विजय देशमुख (राष्ट्रवादी) 4242, चारुशीला विवेक पवार (भाजपा) 6127 तर नोटाला 327 मते मिळाली
म्हसवे गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे यांनी शिवसेनेचे उमेदवार संदीप पवार यांचा 2227 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत वसंतराव ज्ञानदेव मानकुमरे (भाजपा) यांना 9898 संदीप सर्जेराव पवार (शिवसेना)7671, संतोष दिनकर शिराळे (अपक्ष) 300, नोटा 165 असे मतदान झाले.
खर्शी बारामुरे गणात भाजपच्या गोरख महाडिक यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे विठ्ठल गोळे यांचा 866 मतांनी पराभव केला. विठ्ठल गुलाबराव गोळे (राष्ट्रवादी) 3563 गोरख सिताराम महाडिक (भाजप)चा4429,किरण हनुमंत गायकवाड (अपक्ष) 213, नोटा 121. म्हसवे गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सौ.शिल्पा मिलिंद शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या रेश्मा समाधान पोफळे यांना धक्का देत 197 मतांनी विजय मिळवला. सौ.रेश्मा समाधान पोफळे यांना 4655 सौ. शिल्पा मिलिंद शिंदे (राष्ट्रवादी) 4850 संगीता दिनकर भिसे (अपक्ष) 83, नोटा 119.
कुसुंबी गट व दोन्ही गण शिवसेनेने केले काबीज
कुसुंबी गटात अटीतटीच्या लढतीत शिवसेनेच्या कविता एकनाथ ओंबळे विजयी झाल्या असून त्यांनी भाजपच्या अर्चना ज्ञानदेव रांजणे यांचा१८० मतांनी धक्कादायक पराभव केला आहे. सौ.कविता एकनाथ ओंबळे (शिवसेना) 8951,सौ. अर्चना ज्ञानदेव रांजणे (भाजपा) 8771, सौ.कल्पना गणपत पार्टी (अपक्ष) 128 नोटा 105. कुसुंबी गणात भाजपाच्या सौ.पुष्पा चिकणे यांचा सौ.सुनीता दुंदळे यांनी 482 मतांनी पराभव केला. पुष्पा जगन्नाथ चिकणे (भाजपा) 3367, सुनिता विलास दुंदळे शिवसेना 4249 अशी मते मिळाली. आंबेघर तर्फ मेढा गणात अतिश कदम यांनी भाजपच्या विजय सपकाळ यांचा 722 मतांनी पराभव केला. अतिश संतोष कदम शिवसेना 5175 विजय बाबाजी सपकाळ भाजपा 4453 अशी मते मिळाली.या गटात धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती जिंकली असल्याची भावना मतदारांनी व्यक्त केली.
विजयी उमेदवारांनी मेढ्यापासूनच आपापल्या मतदारसंघातील गावांमध्ये गुलालाची उधळण करत डॉल्बीच्या ठेक्यावर मिरवणूक काढली.