
प्रतापगड कारखाना करार मोडण्यासाठी साखर आयुक्तांकडे लवाद दाखल
प्रतापगड कारखाना स्वबळावर चालवणार – सौरभ शिंदे
कुडाळ – किसनवीर सहकारी साखर कारखाना व प्रतापगड सहकारी साखर कारखाना यांच्या तील भागीदारी करार संपुष्टात आणण्यासाठी प्रतापगड कारखान्याच्या वतीने साखर आयुक्तांकडे लवाद दाखल करण्यात आला आहे. तसेच आगामी काळात लवकरच प्रतापगड व्यवस्थापन कारखाना स्वबळावर चालवणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सन २०१२-१३ पासून प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसनवीर सहकारी साखर कारखाना यांच्या मध्ये भागीदारी करार करुन प्रतापगड सहकारी साखर कारखाना सहकारात टिकवण्यात आला.सुरुवातीच्या काळात किसनवीर कारखान्याने प्रतापगड कारखाना पूर्ण क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न केला. परंतु ऩतर किसनवीर कारखान्याची आर्थिक स्थिती ढासळत गेली. त्यामुळे मागील पाच वर्षांत तीन गळीत हंगाम प्रतापगड कारखाना बंद ठेवण्यात आला. यामुळे कारखान्याच्या कामगारांना पंधरा महिने पगार नाही. तसेच पगारावरील प्रा.फंडही भरलेला नाही. कर्मचाऱ्यांना पगार व त्याअनुषंगाने असणारी कोणतीही देयके अदा केली नाहीत. तसेच मागील गळीत हंगामातील ऊसाचे बील बारा महिने झाले तरीही शेतकऱ्यांना मिळाले नाही.त्यामुळे मा.साखर आयुक्त सो.यांनी कारखखन्याची प्राँपर्टी अँटँच करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सातारा यांना दिले होते.
जावली तालुक्यातील शेतकरी व सभासदांच्या ऊसाची वेळेवर तोडणी व्हावी. कारखान्याच्या कामगारांना बाराही महिने काम मिळावेत् त्यांना वेळेवर पगार मिळावे या उद्देशाने आदरणीय शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या चेअरपर्सन सुनेत्रा शिंदे व संचालक मंडळाने साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना भेटून या दोन कारखान्यामधील सामंजस्य करार रद्द करावा असे निवेदन दिले आहे.असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
