Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ त्वरित थांबवा:कुडाळसह पंचक्रोशीत शेतीपंपाची दिवसा लाईट द्या....

जावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ त्वरित थांबवा:
कुडाळसह पंचक्रोशीत शेतीपंपाची दिवसा लाईट द्या. अन्यथा तीव्र आंदोलन करणार चंद्रसेन शिंदे व शेतकऱ्यांचा  इशारा

कुडाळ (जावली) :
जावली तालुक्यात कुडाळसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मिळणारी वीज केवळ रात्रीच्या वेळेत असल्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेती करावी लागत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीपंपाची वीज दिवसा देण्यात यावी, अशी ठाम व रास्त मागणी चंद्रसेन शिंदे, कुडाळ यांनी केली आहे.

सध्या तालुक्यात शेतीसाठी रात्रीची वीजपुरवठा वेळ असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात पाणी देण्यासाठी जागरण करावे लागत आहे. याच काळात शेत परिसरात बिबट्यासह रानडुक्कर, कोल्हे, तरस यांसारख्या हिंस्र जंगली प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच साप, विंचू यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या दंशाच्या घटना घडत असून शेतकऱ्यांच्या जीवितास थेट धोका निर्माण झाला आहे.

त्यातच थंडीचा कडाका वाढला असून तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसच्या खाली घसरला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रात्रभर शेतात थांबून पाणी द्यावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. हे सर्व धोके असूनही जावली तालुक्यात दिवसा शेतीपंपाची लाईट उपलब्ध नसणे, हा शेतकऱ्यांवर होणारा अन्याय असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

आजूबाजूच्या अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपाची वीज दिली जात असताना जावली तालुक्याला मात्र यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून जावली व कुडाळ विभागातील शेतकऱ्यांवर दुजाभाव केला जात असल्याची तीव्र भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर चंद्रसेन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नुकतेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या उपकेंद्रातील उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी अमृतराव शिंदे, वीरेंद्र शिंदे, कालिदास शेवते, ज्ञानेश्वर कुंभार, लोखंडे नाना, उत्तम देवकर, इंद्रजीत शिंदे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

निवेदनात शेतकऱ्यांच्या समस्या व होणारा जीवघेणा त्रास सहानुभूतीपूर्वक न विचारात घेतल्यास येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शेती टिकवण्यासाठी दिवसा शेतीपंपाची लाईट देणे ही काळाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page