जावली तालुक्यात आज १९ जण कोरोना बाधित; कुडाळ मध्ये कोरोनाची पुन्हा एन्ट्री
एकूण – ९७८ , बळी २४, डिस्चार्ज ६२६ ,अँक्टिव्ह ३२८
सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली तालुक्यात आज १९ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. कुडाळ मध्ये पहिल्या ४६ कोरोना बाधित बरे झाल्या नंतर पुन्हा आज गावात कोरोनाची पुन्हा एन्ट्री झाली आहे.
आज कुडाळ येथील खाजगी रुग्णालयातील २ व अँन्टीजेन ४,असे एकूण ६ ,काटवली, १, रिटकवली १,मेढा ५, पिंपळी १, खर्शी तर्फ कुडाळ ४, भिवडी १ अशा आठ जणांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह आला आहे. अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी दिली.कोरोना बाधितांच्या हायरिस्क काँन्टँक्ट मधील तीस जणाच्या स्वाबचे अहवाल तपासणी साठी पाठवण्यात आले आहे.
जावली तालुक्यातील दोन गावात आज कन्टेंमेंट झोनचे निर्बंध लागू – मिनाज मुल्ला
जावली तालुक्यातील पिंपळी व मेढा प्रभाग ९ या दोन गावात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जावलीचे तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद पाटील , गटविकास अधिकारी सतीश बुद्धे व तालुका वैद्यकीय अधिकारी भगवान मोहिते यांच्या संयुक्त अहवाला नुसार वरील दोन गावाला कोरोना बाधित रुग्ण आढलेल्या ठिकाणी निर्धारित नियमानुसार कन्टेमेंट झोन चे निर्बंध लागू करण्यात येत असल्याचा आदेश सातारा जावलीचे उपविभागीय अधिकारी तथा इंसिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांनी पारीत केला आहे.
जावली तालुक्यात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद
जावली तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखला जावा या उद्देशाने सामाजिक कार्यकर्त्यांनी आज पासून आठ दिवसांसाठी जनता कर्फ्यूच्या केलेल्या आवाहनाला जावली तालुक्यात आज पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मेढा, कुडाळ व करहर या मोठ्या बाजारपेठांत मंगळवारी कडकडीत बंद ठेवण्यात आला . परंतु सायगांव, आनेवाडी , केळघर या बाजारपेठांसह ग्रामीण भागातील दुकाने सुरू आहेत.
ज्यावेळी कोरोना बाधित रुग्णांची साखळी बाजारपेठ अथवा त्या गावात होत असते त्यावेळी ओघानेच बाजारपेठ बंद ठेवावी लागते. त्यामुळे कोरोना बाधित रुग्ण नसलेल्या काही बाजारपेठा यावेळी बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला. सततच्या बंद मुळे छोटे व्यापारी व दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेकांची रोजी रोटीच या व्यवसायांवर अवलंबून असते.त्यामुळे कोरोनाच्या संकटाची टांगती तलवार डोक्यावर असली तरीही घरातील चारसहा माणसांना जगवण्यासाठी त्याला रोज कमाई करण्यासाठी धडपड करावीच लागते.अशा प्रतिक्रिया छोट्या व्यावसायिकांमधुन व्यक्त होत आहेत.
तर सध्या जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात सामाजिक संसर्ग सुरू आहे. ज्या प्रमाणात कोरोना बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. त्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. बेड मिळवण्यासाठी कोविड बाधितांना नंबर लावून वाट पहायला लागत आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने उपचारा अभावी अनेकांना प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडत आहेत. आँक्सिजन व व्हेंटिलेटर सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशावेळी संसर्ग रोखणे हाच या परिस्थितीवर इलाज असल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना सामाजिक बांधिलकीची जोड देण्यासाठी जावली तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी आठ दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. जेणेकरुन लोक घरात बसले तर संसर्ग कमी होईल. त्यामुळे लोकांनी कोणताही धोका पत्करुन अनावश्यक घरातून बाहेर पडू नये.
प्रशासन, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते या मध्ये योग्य समन्वय ठेवून योग्य रीतीने कोरोनाच्या या संकटावर लवकरात लवकर मात करणे आवश्यक आहे.सुदैवाने पितृपंधरावड्या नंतर अधिक महिना आल्याने नवरात्रोत्सव एक महिना लांबणीवर पडला आहे. देवानेच दिलेली ही सुसंधी समजुन सर्वानी सामुहिक जबाबदारी घेऊन ,संयम दाखवून कोरोना वर मात केली. व संसर्ग आटोक्यात आणला तर येणारा नवरात्रोत्सव ,दसरा व दिवाळी सण साजरा करता येणार आहे.त्यामुळे जबाबदारीचे भान प्रत्येकाला ठेवावेच लागेल.
