सूर्यकांत जोशी कुडाळ – ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व शाळांपासून शंभर मीटर परिघात तंबाखू जन्य पदार्थांची विक्री व सेवन करणारांवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण पथकाने अचानक भेट देऊन दंडात्मक कारवाई केली.
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कर्क रोग नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.विषेशत; तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनामुळे कर्क रोगाचा सर्वाधिक धोका असतो.तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस संगती मुळें तंबाखूच्या व्यसनात अडकत आहे.याला सुशिक्षित वर्ग ही अपवाद नाही.बर्याचदा शासकीय कर्मचारी, शिक्षक सुद्धा तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन करताना आढळतात.याचाही एक दुष्परिणाम सर्वसामान्य जनता तसेच विद्यार्थी वर्गावर होत असतो.
जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत एक समिती कार्यरत आहे.या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. लोकांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करण्या बरोबरच शासकीय कार्यालयांच्या प्रतिबंधात्मक ठिकाणी तंबाखू जन्य पदार्थांची विक्री व सेवन केल्याचे आढळल्यास कलम चार अन्वये दंडात्मक कारवाई या पथकाच्या वतीने केली जात आहे.याशिवाय कलम चार ते सात नुसार सार्वजनिक ठिकाणी तंबाखू सेवन केल्याचे आढळल्यास पोलीसांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जावली तालुक्यात आज या पथकातील दिपाली इंगवले.इला ओतारी यांनी शासकीय रुग्णालये व शाळांना अचानक भेट देऊन या परिसरात तंबाखू जन्य पदार्थांची विक्री व सेवन करणारांवर दंडात्मक कारवाई केली.या पथकाने, केळघर, मेढा, कुडाळ याठिकाणी पंधरा जणांवर प्रत्येकी दोनशे रुपये दंडाची कारवाई केली.या पथकाला मेढा पोलीस ठाण्याचे सपोनि.अमोल माने तसेच पोलिस दूर क्षेञाच्या स्थानिक पोलीसांनी सहकार्य केले.