चार धरणे उशाला असूनही जावलीकरांच्या घशाला कोरड:
सूर्यकांत जोशी कुडाळ – एकेकाळी विक्रमी पावसाची नोंद होणाऱ्या जावली तालुक्यावर यावर्षी पावसाअभावी दुष्काळाची छाया अधिक गडद झाली आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना तसेच कण्हेर, महू व हातगेघर ही चार धरणे उशाला असूनही जावली करांच्या घशाला कोरड पडली आहे. पावसाअभावी यावर्षी रब्बीच्या पेरण्या अद्याप झाल्या नाहीत. तसेच होण्याची शक्यताही दिसून येत नसल्याने शेतकऱ्यांपुढे अन्नधान्य सोबतच गुरांचा चाऱ्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
तालुक्याच्या दक्षिणेला कोयनेचा भव्य जलाशय तर मेढ्यालगत कण्हेर धरण, कुडाळ विभागाला वरदान ठरणारे महू व हातगेघर धरणे आहेत. या धरणांमध्ये विस्थापित होण्याचे झळजावलीकरांनी सोसली परंतु या धरणातील पाण्याचा वापर मात्र जावलीकरांच्या नशिबात नाही. जावली तालुक्यातील कुडाळ विभागाला वरदान ठरणाऱ्या कुडाळी प्रकल्पातील महू व हातगेघर धरणाचा गेल्या पंचवीस वर्षात झालेल्या खेळखंडोबा गिनीज बुकात नोंद व्हावे असाच आहे. गेले पंचवीस वर्षाहून अधिक काळ या प्रकल्पाचे काम रखडले आहे. धरणाचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. गेली दहा वर्ष कालव्याच्या पाईपलाईनची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत .
गेल्या पंचवीस वर्षात शासन आणि प्रशासन बदलत गेले. जावली तालुक्याचे लोकप्रतिनिधी बदलले. धरणाच्या बाबतीतल्या आश्वासने आणि धरणाची स्थिती मात्र त्याच ठिकाणी राहिली. परिणामी गेल्या पंचवीस वर्षात या धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दैनिक ऐक्याने या धरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी सातत्याने आवाज उठवला. 2015 साली दैनिक ऐक्याच्या माध्यमातून या धरणाच्या माध्यमातून असणाऱ्या विविध प्रश्नांवर दहा दिवसांचे लेख मला लावून प्रकाश टाकण्यात आला होता. परंतु आजही परिस्थितीत जैसे ते असल्याचे दिसून येते. या धरणाच्या प्रश्नावर आजपर्यंत अनेक वेळा विविध प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून वेळोवेळी आवाज उठवण्यात आला परंतु त्यामध्ये फारशी सुधारणा झाली नाही. समाजाभिमुख काम होण्यासाठी शासनच्या जनतेचा जो रेटा लागतो तो या ठिकाणी कधीही दिसून आला नाही.
.
या धरण क्षेत्रात बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी विविध प्रकारचे आंदोलने केली. त्यामुळे पुनर्वसनाचे काम बहुतांश पूर्ण होऊ शकले. परंतु लाभ क्षेत्रातील जनता लोकप्रतिनिधींच्या आश्वासनावर आज पर्यंत विसंबून राहिली. परिणामी पूर्ण एका पिढीच्या प्रगतीला ब्रेक लागला. परंतु अजूनही लाभ क्षेत्रातील जनता नेत्यांच्या भरोशावरती विश्वास ठेवून आहे. जावली पंचायत समितीचे माजी उपसभापती रवींद्र परमणे यांनी या धरणाचे व कालव्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी उपोषणाचा इशारा दिला परंतु त्यासाठी जनतेचा रेटा उभा करून प्रत्यक्ष जन आंदोलन अध्याप उभे राहिले नाही. या धरणाचे उर्वरित काम लवकर पूर्ण करणार अशी ग्वाही आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.आणि जावळीतील जनतेला आ.शिवेंद्रसिंह राजें दिलेला शब्द पाळणार असा विश्वास आहे.
महू व हातगेघर धरणाच्या कालव्याच्या पाईपलाईनचे काम जिथे पर्यंत पूर्ण झाले आहे. त्या क्षेत्रातून जरी पाण्याची उपलब्धता केली गेली तरीसुद्धा या धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावाना पिण्याच्या पाण्यासाठी काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. येत्या महिनाभरात कालव्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
यावर्षी पावसाअभावी अनेक पाझर तलाव कोरडे ठणठणीत आहेत. नद्या आणि ओढे सुद्धा नोव्हेंबर महिन्यातच कोरडे ठणठणीत पडले आहेत. डोंगर उतारावरील गावावर आत्तापासूनच पाणीटंचाईंचे संघटन घोंगावत आहे. धोम कालव्याचे पाणी ऊस बागायती पिकासाठी मिळणे बाबत साशंकता असल्याने उसाच्या लागणी होऊ शकले नाहीत. तसेच अन्य बागायती पिकांना सुद्धा याचा फटका बसला आहे.
कुडाळी प्रकल्पातील धरणांची कामे रखडल्याने त्याचा परिणाम प्रतापगड सहकारी साखर कारखान्यावर सुद्धा निश्चित झालेला आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पुरेसे उसाचे क्षेत्र निर्माण होऊ शकले नसल्याने कारखान्याला सुद्धा त्याची झळ बसली आहे. यावर्षी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ बाबा शिंदे यांच्या प्रयत्नातून अजिंक्यतारा कारखान्याच्या माध्यमातून प्रतापगड सहकारी साखर कारखाना सुरू झाला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कारखाना सुरु झाल्याने कामगारांच्या हाताला काम मिळाले आहे. तसेच तालुक्यातील बाजारपेठामध्येही उलाढाल वाढल्याचे दिसून येत आहे.
