सूर्यकांत जोशी कुडाळ – म्हसवे ता. जावली येथे डोंगरी विकास कार्यक्रम साडे आठ लाख निधीतून होत असलेल्या अंगणवाडी इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामात भ्रस्टाचार व अनियमितता आहे. या कामाबद्दल वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी दिल्या नंतर काम बंद ठेवण्यात आले आहे. परंतु या कामाबाबत माहिती अधिकाराने मागितलेली पूर्ण माहिती देण्यास जावली बांधकाम उप विभागामार्फत टाळाटाळ केली जात आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली असून आवश्यक माहिती नं दिल्यास उपोषणास बसणार असल्याचा इशारा जावली पंचायत समितीचे माजी उप सभापती तानाजी शिर्के यांनी दिला आहे.
या बाबत शिर्के यांनी दिलेली माहिती अशी,डोंगरी विकास निधीतून म्हसवे येथे अंगणवाडी इमारत बांधन्यात येत आहे. हे काम ठेकेदाराने दिलेल्या अंदाज पत्रक व नियोजन आराखड्या नुसार नं करता मनमानी करून अत्यंत निकृष्ठ सुरु ठेवले. याबाबत पंचायत समिती उपाभियंता जावली यांच्या कडे तक्रार केल्यावर त्यांनी कामाची पाहणी केली. सदर काम बंद ठेवण्याचे आदेश दिले.
परंतु सदर कामाची माहिती मिळणे साठी संबंधित विभागाला माहिती अधीकार कायद्याप्रमाणे माहिती मागितली. परंतु अपूर्ण माहिती देण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
शासनाच्या निधीतून होणारी कामे दर्जेदार झालीच पाहिजेत यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. प्रसंगी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तानाजी शिर्के यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केला आहे.