गुलाल तर आपलाच -आ. शिवेंद्रसिंह राजे

सूर्यकांत जोशी कुडाळ – ज्यांना सहकार म्हणजे काय कळत नाही असेच लोक सहकारी संस्थांच्या निवडणुका लावण्याचे काम करतात. त्यांच्या मी पणाच्या अट्टाहासाने जावली महाबळेश्वर बाजार समितीची निवडणूक लादली आहे. या निवडणुकीत गुलाल तर आपलाच असून केवळ निकालाची औपचारिकता बाकी आहे असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केले.
जावली महाबळेश्वर बाजार समितीच्या शेतकरी विकास पॅनल च्या कुडाळ येथे झालेल्या सांगता सभेत आ. भोसले बोलत होते.सभेला जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे,जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, ज्ञानदेव रांजणे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सर चिटणीस तेजस शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आ. भोसले म्हणाले, पक्षीय राजकारण आणि राजकीय मतभेद बाजूला ठेऊन केवळ बाजार समितीच्या हितासाठी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील यांच्यासह एकत्र येऊन हीं i निवडणूक बिन विरोध करण्यासाठी प्रयत्न केले.परंतु ज्यांना एकही सहकारी संस्था चालवता आली नाही. किंवा एकही संस्थेत स्थान नाही अशा लोकांनी हा निवडणुकीचा घाट घातला आहे. त्यांना पूर्ण पॅनल सुद्धा उभे करता आले नाही. विरोधी पॅनल चे उमेदवार निवडणूक लागल्या पासून ट्रीपला गेल्याचे चित्र आहे. विजय नक्कीच आपला आहे. परंतु अशा लोकांनी पुन्हा निवणूक लावण्याचे धाडस करू नये असा त्यांचा पराभव करा असे आवाहन आ. भोसले यांनी उपस्थित मतदारांना केले.
कोणतीही निवडणूक लागली की निवडणूक लावणारे बिचुकले जावलीत तयार असतात अशी खिल्ली वसंतराव मानकुमरे यांनी दीपक पवार यांचे नाव न घेता उडवली. प्रत्येक निवडणुकीत जावली तालुका खरेदी विक्री संघ बंद असल्याची वलगना करणारांना संघांचे सुरु असणारे रेशनींग व खत विभाग दिसत नाहीत का असा सवाल प्रतापगड कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केला.
जयदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले, संदीप परामणे यांनी सूत्र संचालन केले. प्रमोद शिंदे यांनी आभार मानले.