सूर्यकांत जोशी कुडाळ – जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीन आमदारांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय संपादन केला. त्यानंतर आज गुरुवार दि.25 रोजी सभापती व उपसभापती पदाची निवड होणार आहे. यासाठी कोणाची वर्णी लागते यांची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.सध्या आ. मकरंद पाटील व आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस मधून बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र भिलारे व आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक बाजार समितीचे माजी उपसभापती जयदीप शिंदे व मच्छिन्द्र मुळीक यांची नावे चर्चेत आहेत.
असे असले तरीही राजेंद्र भिलारे व जयदीप शिंदे हे अत्यंत जिवलग मित्र असून मैत्री साठी ते जयदीप शिंदे यांना सभापती पदाची भेट देतील अशी शक्यता आहे.तसेंच प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांची भूमिका महत्वाची दिसून येत आहे.तरीही पॅनलचे नेतृत्व करणारे आ. शिवेंद्र सिंह राजें भोसले, आ. शशिकांत शिंदे व आ. मकरंद पाटील यांचा कौल कोणाला मिळणार हे महत्वाचं आहे.
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचे सरकार सत्तेवर असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळेच राजकीय चित्र दिसून येते. त्याचा प्रत्यय येथील बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आला.आ. शिवेंद्र सिंह राजे भोसले, आ. शशिकांत शिंदे व आ. मकरंद पाटील यांनी एकत्र येऊन उभ्या केलेल्या पॅनलला माजी आमदार सदाशिव सपकाळ, दीपक पवार व शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप पवार यांनी आव्हान दिले. ही निवडणुक तीन आमदारांच्या पॅनलने एकतर्फी जिंकली आहे.
यापूर्वी ही बाजार समिती आ. शशिकांत शिंदे व आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात होती. आता आ. शिवेंद्र सिंह राजें च्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष्यानेही बाजार समितीत प्रवेश केला आहे. माजी सभापती राजेंद्र भिलारे व उपसभापती जयदीप शिंदे यांच्या कारकिर्दीत कृषी प्रदर्शन, सोयाबीन खरेदी विक्री लिलाव या सारखे विविध उपक्रम राबवले गेले होते. नेत्यांशी असणारी जवळीक आणि पूर्वानुभव पाहता बाजारसमितीत पुन्हा भिलारे शिंदे पर्व सुरु होणार की भिलारे शिंदेच्या पाठीशी भक्कम उभे राहणार . या बाबत उत्सुकता कार्यकर्त्यां मध्ये दिसून येत आहे.
पूर्वी सातारा जावली शेती उत्पन्न बाजार समिती होती. यातून आ. शशिकांत शिंदे यांनी त्यावेळच्या विधानसभा मतदार संघाप्रमाणे जावली व महाबळेश्वर तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आणली.या बाजार समितीच्या निर्मितीला पंचांवीस वर्षे होत आली आहेत. परंतु यासंस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने अपेक्षित उत्पन्नाचा श्रोत अद्याप निर्माण होऊ शकला नाही.