Sunday, April 5, 2026
HomeTop Newsजावली व वाई तालुक्याला जोडणारा सर्जापूर कळंभे पूल मोजतोय अखेरच्या घटका :                             ...

जावली व वाई तालुक्याला जोडणारा सर्जापूर कळंभे पूल मोजतोय अखेरच्या घटका :                              सार्वजनिक बांधकाम विभागाच्या च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष: पुलाची उंची वाढवण्यासाठी व रुंदीकरणासाठी नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा.


सूर्यकांत जोशी कुडाळ- जावळी व वाई तालुक्याला जोडणाऱ्या कुडाळी नदीवरील सर्जापूर ते कळंभे या पुलाची दयनीय अवस्था झाली असून हा पूल आता अखेरच्या घटका मोजू लागलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे या पुलाच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सर्जापूर व कळंभे ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान कुडाळ विभागातील सुमारे 60 ते 70 गावातील वाहनधारक पुणे बेंगलोर महामार्गावर या रस्त्याने जाणे पसंत करत असल्यामुळे या पुलावरील रहदारी वाढली आहे.तरी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी या पुलाची उंची वाढवण्यासाठी तसेच रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी होत आहे.
             सर्जापूर व कळंबे या गावांच्या मधून कुडाळी नदी वाहते. नदीच्या एका किनाऱ्यावर जावली तालुक्याच्या पूर्व हद्दीवरील सर्जापूर  तर नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वाई तालुक्यातील कळंभे गाव आहे या दोन्ही तालुक्याच्या हद्दीच्या सीमेवरून कुडाळी नदी वाहते या नदीवरील पुलाच्या माध्यमातून वाई व जावली तालुका जोडला गेला आहे हा पुल होण्यासाठी दोन्ही तालुक्यातील वाहनधारकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.हा पूल मंजूर झाल्यानंतर सुद्धा अर्धवट अवस्थेत अनेक वर्ष पडून होता. राज्यात शिवसेना भाजपाचे युती सरकार असताना तीस वर्षांपूर्वी तत्कालीन वाईचे आमदार मदनराव पिसाळ व जावली चे तत्कालीन आमदार सदाशिव सपकाळ यांनी विशेष प्रयत्न करून या पुलाचे बांधकाम पूर्णत्वास नेले . परंतु त्यानंतर मात्र या पुलाच्या दुरुस्ती देखभालकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.
               वाई तालुक्यातील कळंभ, वीरमाडे तसेच जावली तालुक्यातील आनेवाडी, रायगाव,सायगाव या विभागातील जनतेला कुडाळ बाजारपेठेची जोडणारा हा पूल आहे. त्याचबरोबर कुडाळ करहर हुमगाव विभागातील वाहनधारकांना सर्जापूर कळंभे मार्गे पुणे बेंगलोर महामार्गावर आनेवाडी, रायगाव येथे येण्यास हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. जावली तालुक्याच्या हद्दीतील सर्जापूर गावचा रस्ता नदीवरील पुलाच्या किनाऱ्यापर्यंत डांबरीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कळंभे गावातील रस्ता सुद्धा या पुलाच्या एका किनाऱ्यापर्यंत आले आहे.परंतु पुलावरील रस्ता केला नाही. आता पुलाच्या स्लॅबचा काँक्रीट चा थर नाहीसा होऊ लागला असून त्याचे लोखंडी सळया उघड्या दिसू लागल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.
           कुडाळी नदीवरील पूल धोकादायक
सर्जापूर ते कळंभे दरम्यान असणाऱ्या कुडाळी नदीवरील पुलाची गेल्या अनेक वर्षापासून कोणतेही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.कोणतीही दुर्घटना घडल्यानंतरच शासनाला व सार्वजनिक बांधकामाविभागाला जाग येणार का असा संतप्त सवाल वाहनधारक करत आहेत शासनाने तातडीने दखल घ्यावी व या पुलाच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावावे.
विठ्ठल बोराटे – माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जापूर

ना. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध –
        गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीसाठी कळंबे ग्रामपंचायतीने मागणी केली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या पुलाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नव्हता. परंतु आता ती अडचण दूर झाली असून  नामदार मकरंद पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने या पुलाच्या दुरुस्ती साठी पंचायत समितीच्या शेष फंडातून निधी मंजूर झाला आहे. लवकरच या पुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या पुलावरून वाढती रहदारी पाहता या पुलाची उंची वाढवण्यासाठी व रुंदीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
        प्रकाश बाबर – माजी उपसरपंच कळंभे
      

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

You cannot copy content of this page