
सूर्यकांत जोशी कुडाळ-
जावळी तालुका म्हणजे निसर्गाने भरभरून दिलेले दान.
शिवसागर जलाशयाचा अथांग विस्तार, सभोवतालची घनदाट झाडीची जंगले, सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला वासोटा किल्ला, कास–बामनोली–मुनावळे–तापोळा, वैराटगड, श्री क्षेत्र मेरूलिंग, नव्याने विकसित होऊ घातलेले महू धरण परिसर, लगतचे प्रसिद्ध महाबळेश्वर–पाचगणी… जावली तालुक्याचे हे अलौकिक सौंदर्य पाहिल्यावर अनेक पर्यटकांच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडतात — “हा तर पृथ्वीवरचा स्वर्ग आहे!”
पावसाळा ओसरला की साधारण नोव्हेंबरपासून जावळी तालुक्याकडे पर्यटकांची पावले आपोआप वळू लागतात. धुक्याची शाल पांघरलेले डोंगर, हिरवाईने नटलेली जंगले, निळ्याशार पाण्यावर उमटणारी सूर्यकिरणे — हे दृश्य अनुभवण्यासाठी लोक दूरदूरहून येतात. आजच्या इंटरनेट आणि मोबाईलच्या युगात समाजमाध्यमे पर्यटनाची खरी जाहिरात ठरत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरून जावळीतील पर्यटनस्थळे, होम-स्टे, रिसॉर्ट्स, बोटिंग, वॉटर स्पोर्ट्स यांची माहिती एका क्लिकवर पर्यटकांपर्यंत पोहोचते. ‘हाय-टूरिझम’च्या गोंगाटातून बाहेर पडून निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ जगण्याची ओढच पर्यटकांना जावळीपर्यंत खेचून आणत आहे.
विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी रस्ते अपुरे, पार्किंग नाही, सुरक्षिततेची साधने कमी, मूलभूत सुविधा तोकड्या — तरीही पर्यटकांचा ओघ थांबलेला नाही.खरे तर जे येथील स्थानिक नेत्यांना आणि गेल्या अनेक वर्षांच्या राजकीय धोरणांना कळले नाही, ते बाहेरून आलेल्या पर्यटकांना अचूक कळले — जावळी ही दुर्गम नाही, तर अफाट पर्यटनक्षमतेचा खजिना आहे.
मात्र या निसर्गसंपन्नतेला गेली अनेक दशके “दुर्गम, डोंगराळ, शैक्षणिक-सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास” अशीच ओळख लावली गेली. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षे हा तालुका विकासाच्या रांगेत शेवटाकडे राहिला, हे केवळ दुर्दैव नसून सामूहिक अपयश आहे. येथील भूमिपुत्र कंगाल झाला. पर्यटनस्थळांच्या आसपासच्या जमिनी कवडीमोल भावात बाहेरच्या धनदांडग्यांनी विकत घेतल्या. कालचा जमीनदार आज त्याच रिसॉर्टमध्ये रोजंदार म्हणून काम करताना दिसतो, ही सामाजिक शोकांतिका नाही तर काय?
एक काळ असा होता की जावळीतील तरुणांना मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे स्थलांतर करावे लागले. माथाडी कामगार बनून डोक्यावर ओझी वाहण्याची वेळ आली. हे सारे केवळ नशिबाच्या माथी मारून चालणार नाही. धोरणात्मक दुर्लक्ष, नियोजनाचा अभाव आणि इच्छाशक्तीचा तोटा — हेच त्यामागचे खरे कारण होते.
आज मात्र परिस्थिती बदलण्याची संधी निर्माण झाली आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची नवी पहाट जावळीत उगवत आहे. भूतकाळाच्या चुका आठवून रडत बसण्यापेक्षा, येणाऱ्या सुवर्णकाळाचा लाभ कसा घेता येईल याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.
सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारख्या जागृत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते विकसित होऊ लागले आहेत, ही सकारात्मक बाब आहे. मात्र हे रस्ते केवळ डांबरी नव्हे, तर दर्जेदार, सुरक्षित, बारमाही वाहतुकीस योग्य असले पाहिजेत. त्यासोबतच पार्किंग, स्वच्छता, शौचालये, मार्गदर्शक, आपत्कालीन सुविधा, पर्यटकांचे संरक्षण आणि दरवाढीच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबवणे — या साऱ्यांकडे प्रशासनाने ठोस लक्ष दिले पाहिजे.
आजचे लोकप्रतिनिधी इतिहास बदलू शकतात. पर्यटन उद्योगाच्या माध्यमातून जावळीचा चेहरामोहरा बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. इथून स्थलांतर करणारा तरुण पुन्हा इथेच उद्योग, व्यवसाय, हॉटेल्स, होम-स्टे, पर्यटनपूरक सेवांमध्ये रोजगार मिळवू शकतो, असे नियोजन झाले तर जावळीचा कायापालट अटळ आहे.तालुक्यात औद्योगिक प्रगतीला मर्यादा, शेतीवर अवलंबित्व, बागायती क्षेत्राचा अभाव आणि केवळ खरीपावर जगणारा शेतकरी — या वास्तवातून बाहेर पडायचे असेल, तर पर्यटन आणि शेतीपूरक व्यवसाय हाच जावळीचा विकासमार्ग ठरू शकतो.निसर्गाने दिलेल्या या अमूल्य देणगीचे सोने करण्याची संधी आज आपल्या हातात आहे.
प्रश्न इतकाच आहे — ही संधी आपण जावळीच्या भूमिपुत्रांसाठी वापरणार आहोत का, की पुन्हा एकदा इतिहासाच्या पानावर “एक संधी वाया गेली” असे लिहिले जाणार?