
सूर्यकांत जोशी कुडाळ :
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या स्वाभिमानी शिवसैनिक एकनाथ ओंबळे यांनी कुसूंबी गटात आपल्या पत्नीच्या माध्यमातून मिळवलेला विजय हा केवळ राजकीय यश नसून कार्यकर्त्यांच्या जिद्दीचा आणि जनतेच्या विश्वासाचा विजय आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुकाची थाप दिली.
कुसूंबी गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या सौ. कविता ओंबळे यांनी मुंबईतील मंत्रालयात उपमुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत कुसूंबी गटातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाकांक्षी विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. “जावळीच्या विकासासाठी एकनाथला हवे ते सहकार्य देणार,” अशी ठाम ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.
विकासाच्या मुद्यांवर थेट चर्चा
भेटीदरम्यान कुसूंबी गटातील रस्ते विकास, पाणीपुरवठा योजना, पर्यटनवाढ, ग्रामीण आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती या मुद्द्यांवर सकारात्मक संवाद झाला. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
“कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळेच भगवा उंचावतो,” असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम, एकनाथ ओंबळे तसेच तालुक्यातील शिवसेना नेतृत्वाच्या कार्याचे कौतुक केले. “भगव्याची उंची तुम्ही वाढवली,” या शब्दांत त्यांनी जनतेच्या जनादेशाचा सन्मान व्यक्त केला.
शिष्टमंडळाची उपस्थिती
या भेटीस सातारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, जिल्हा परिषद सदस्या कविता ओंबळे, उपतालुकाप्रमुख नंदू गोरे, सचिन शेलार, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख प्रशांत जुनघरे, तालुकाप्रमुख समीर गोळे, तसेच सुधीर करंदकर, विजय धनावडे, दत्ता ओंबळे, प्रणव सावले, संदीप कासुर्डे आणि बाळासाहेब शिर्के उपस्थित होते.
जनतेच्या विश्वासाला न्याय देणार – कविता ओंबळे
माझ्या विजयाचे सर्व श्रेय गटातील कार्यकर्ते, जनता आणि त्यांच्या विश्वासाला आहे. कुसूंबी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच जिल्हा परिषदेमार्फत दर्जेदार आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास मी कटिबद्ध आहे. राज्यस्तरावरून आवश्यक निधी आणि प्रशासकीय सहकार्य मिळावे, अशी भावना सौ. कविता ओंबळे यांनी व्यक्त केली.
कुसूंबीत उत्साहाचे वातावरण
उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर कुसूंबी गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कार्यकर्त्यांमध्ये नव्या उमेदीचा संचार झाला असून, कुसूंबीच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सामान्य घरातून उभा राहिलेला हा विजय आणि मंत्रालयातून मिळालेले पाठबळ—या दोन्हींच्या संगमातून कुसूंबी गटाच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
