“
—
???? सूर्यकांत जोशी कुडाळ, 9421214450
लोकशाहीच्या मुळाशी असलेले स्थानिक स्वराज्य हे खऱ्या अर्थाने जनतेच्या मनातील शासन आहे. गावागावात लोकशाहीचे मूळ मजबूत ठेवणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या फक्त राजकीय स्पर्धा नसून, त्या जनतेच्या विकासाच्या दिशेचा निर्णय ठरतात.
उमेदवार निवडताना जनता आता फक्त पक्ष पाहत नाही, तर त्या व्यक्तीचा चरित्र, कार्यक्षमता आणि लोकांशी असलेला संवाद या गोष्टींकडे अधिक लक्ष देते. लोकांना आज हवा आहे तो जनतेतून उभा राहिलेला, प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त आणि संवेदनशील लोकप्रतिनिधी.
अनेकदा आपण पाहतो की काही उमेदवार निवडणुकीच्या काळातच गावात फिरतात, गोड बोलतात आणि निवडून आल्यानंतर अदृश्य होतात. जनतेच्या भावना या वेळेस मात्र वेगळ्या आहेत. लोकांना हवे आहेत असे नेते, जे निवडून आल्यानंतरही त्यांच्या सुख-दुःखात सहभागी राहतील, जे गावाच्या रस्त्यांपासून शाळांपर्यंत आणि पाण्याच्या प्रश्नांपासून आरोग्यापर्यंत जबाबदारीने काम करतील.
खरा उमेदवार तोच, जो मतांच्या राजकारणाऐवजी जनतेच्या विश्वासाचे राजकारण करतो. गावातील प्रत्येक घटक – शेतकरी, महिला, युवक, वयोवृद्ध – यांचा सन्मान राखून, विकासाचा आराखडा तयार करतो. पक्षीय भेद विसरून गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जो झटतो, तोच खरा लोकनायक ठरतो.
आजच्या जनतेला पैसा नव्हे, तर पारदर्शकता आणि विश्वास हवा आहे. वचनांवर नव्हे, तर कृतीवर विश्वास ठेवणारा उमेदवारच जनतेच्या मनावर राज्य करेल.
आगामी निवडणुकांत मतदारांनीही विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कारण मतदान ही केवळ जबाबदारी नाही, तर गावाच्या भविष्यासाठीचा सर्वात मोठा निर्णय आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवार कसा असावा” : जनतेच्या अपेक्षांचा उमेदवार कोण?
- Advertisment -