महाराष्ट्र नाभिक महमंडळाचा निर्णय : जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांची माहीती
मेढा,ता. ६ : सातारा जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र नाभिक महमंडळाने आज पासून ८ दिवस सलून व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला असून ता. सात पासून ते ता. १५ पर्यंत सलून व्यवसाय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष विजय सपकाळ यांनी दिली.
याबाबत श्री सपकाळ म्हणाले कोरोनाची साखळी तुठण्यासाठी, मानव जातीच्या कल्याणासाठी आणि प्रशासनाच्या मदतीसाठी आपले कर्तव्य म्हणून आम्ही एक जबाबदार सातारा जिल्ह्यातील सर्व नाभिक बांधव व सुज्ञ नागरिक म्हणून या कोरोना महामारीच्या लढ्याला आपला हातभार म्हणून कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात रोजच कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येत वाढ होताना दिसंत आहे. जिल्ह्यातील प्रशासनाकडून कोरोना साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने काही जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे प्रकार ही घडले आहेत. या अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र नाभिक महामंडळाने हा स्वयंस्फूर्तीने हा बंद पुकारला आहे.
शासनाकडून काही नियम देऊन सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र सध्याच्या वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर हा व्यवसाय ८ दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय नाभिक समाजाने घेतला आहे.
सातारा शहरातील व तालुक्यातील सर्व सलून व्यवसायिकांनी उद्या ता. ७ पासून आपले व्यवसाय बंद करण्याच्या सूचना वरून दिल्या आहेत. त्या प्रमाणे सातारा शहरातील व तालुक्यातील सलून व्यवसाय ८ दिवसासाठी बंद ठेवली जाणार असल्याची माहिती सातारा शहराध्यक्ष लक्ष्मण जाधव व तालुकाध्यक्ष पांडूरंग राऊत यांनी दिली आहे.