सूर्यकांत जोशी कुडाळ – टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले म्हणून पतीने घातला पत्नीच्या डोक्यात धोंडा घालून गंभीर जखमी केले तर सुनेला सोडवण्यासाठी गेलेल्या आईला मुलाने काठीने बडवलेची धक्कादायक घटना सोनगांव तालुका जावली येथे बुधवारी सकाळी घडली. याबाबतची तक्रार सौ.पल्लवी विनोद शिंदे वय ३३ या जखमी पत्नीने कुडाळ पोलीस दूर क्षेत्रात दिली आहे.
दारुमुळे महिलांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या विरोधात महिलांनी लढा उभारून जावली तालुक्यात दारूची दुकाने बंद करुन बारा वर्षे झाली. परंतू दारू पिणारांची तोंडे बंद झाली नाहीत. अवैध दारू विक्रेते गल्ली बोळात झाले आहेत. आणि याचा त्रास महिलांना आजही तितकाच होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
याबाबत पल्लवी शिंदे यांनी दिलेल्या जबाबा बाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास विनोद बबन शिंदे वय ३८ वर्षे रा.सोनगांव, ता.जावली हा दारु पिऊन घरी आला व टिव्ही मोठ्या आवाजात लावला. यावेळी घरात काम करत असलेल्या पत्नी पल्लवी हिने त्याला टिव्ही चा आवाज कमी करण्यासाठी सांगितले. याकारणावरून चिडलेल्या विनोदने दरवाजाला लावलेला दगड उचलून पत्नी पल्लवी हिच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले.सुनेला जखमी झालेले पाहुन तिला सोडवण्यासाठी पल्लवी च्या सासू पुष्पा बबन शिंदे पुढे गेल्या. त्यावेळी विनोदने आपल्या जन्मदात्या आईला काठीने मारले असल्याचे या तक्रारी मध्ये नमूद केले आहे. त्यानुसार मेढा पोलीस ठाण्यांतर्गत कुडाळ पोलीस दूर क्षेत्रात विनोद बबन शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहा.फौजदार यु.एन.शिंदे खरत आहेत.